180 ग्रामस्थांची अद्ययावत संगणकीय उपकरणांद्वारे डोळ्यांची तपासणी
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना शिबिराद्वारे आधार -पै. नाना डोंगरे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने वरद नेत्रालय, महेश चष्मावाला, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय तसेच निमगाव वाघा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य व स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच उज्वला कापसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उपसरपंच किरण जाधव, ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, डॉ. रावसाहेब बोरुडे, महेश दंडवते, भावेश दंडवते, अंकिता लगड, भाऊसाहेब (बंटी) जाधव, मोनिका दगाबाज, नवनाथ फलके, श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, गणेश येणारे, दिपक जाधव, सोमा आतकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पै. नाना डोंगरे म्हणाले की, सध्याच्या काळात आरोग्यसेवा महाग झाल्याने सामान्य नागरिकांना तिचा लाभ घेणे कठीण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांच्या विविध समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहेत. नेत्राच्या शस्त्रक्रिया व उपचार आजार महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट नसल्याने ज्येष्ठांची परवड होत आहे. अशा शिबिरातून त्यांना आधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच उज्वला कापसे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य विषयक सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने ग्रामपंचायतीच्या वतीने अशा उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. डॉ. रावसाहेब बोरुडे यांनी सांगितले की, सेवाभावाने ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये दृष्टीदोष आढळलेल्या अनेक नागरिकांवर अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, यामध्ये मोतीबिंदू व काचबिंदूसारख्या आजारांवरील उपचारांचा समावेश आहे.
गावातील नवनाथ मंदिराच्या सभामंडपात हे शिबिर पार पडले. अद्ययावत संगणकीय उपकरणांच्या साहाय्याने सुमारे 180 ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली. गरजू नागरिकांना अल्प दरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला व तरुण वर्गालाही मोठा लाभ झाला असून, ग्रामस्थांनी आयोजकांचे आभार मानले.
