• Tue. Nov 4th, 2025

शहरात झालेल्या विभागीय अबॅकस स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

ByMirror

Apr 3, 2024

अवघ्या काही मिनीटातच विद्यार्थ्यांनी सोडवले गणिताचे पेपर

अपयशाला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उतरावे -लता कर्पे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या वतीने शहरात घेण्यात आलेली विभागीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये दोन हजारपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.


सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक येथे ही स्पर्धा पार पडली. सकाळच्या सत्रात घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते झटपटपणे सोडवून, अवघ्या 5 मिनीटाच्या आतमध्ये आपला पेपर सोडवित उपस्थितांना अवाक केले. ही स्पर्धा केजी, ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेवल 1 ते 7 व वैदिक मॅथ्स या गटात पार पडली. 5 मिनीटाच्या राऊंडमध्ये अवघड गणिती प्रक्रियेचे पेपर विद्यार्थ्यांनी अत्यंत जलदगतीने सोडविली.


दुपारच्या सत्रात पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साई इंजल इंटरनॅशनल स्कूलच्या अध्यक्षा लता उत्तमराव कर्पे, दिपालीताई बारस्कर, ज्योती खेडकर, मुख्याध्यापिका ज्ञानसी कौल, अनिता ढगे, प्रतिक्षा रसाळ, मुख्याध्यापिका सौ. चिंचकर, युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा हेमलता काळाणे आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पाहुण्यांचे स्वागत सुनिल काळाणे यांनी केले. प्रास्ताविकात हेमलता काळाणे यांनी अबॅकस फक्त गणित विषया पुरता मर्यादीत नसून, यामुळे विद्यार्थ्यांच्या बुध्दीमत्तेला चालना मिळते. उजचा व डावा मेंदू कार्यान्वीत होवून कुशाग्र बुध्दीमत्तेने मुले आपला विकास साधतात. अबॅकसमध्ये पारांगत झालेला विद्यार्थी इतर स्पर्धा परीक्षेतही आपली गुणवत्ता सिध्द करीत असल्याचे सांगितले. तर वैदिक मॅथ्सची त्यांनी माहिती दिली.


लता कर्पे म्हणाल्या की, अपयशाला न घाबरता विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उतरावे. यश-अपयश हे प्रत्येकाचे जीवनात असते. अपयश आल्याशिवाय यश प्राप्ती होत नाही. ध्येयावर लक्ष केंद्रित करुन प्रयत्न करण्याची गरज आहे. तर अबॅकसने आजच्या विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षणाची शिदोरी मिळाली आहे. स्पर्धा परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय आहे. अबॅकसने मोठ-मोठ्या गणिताची प्रक्रिया काही क्षणातच सोडविता येते. अबॅकसने मुलांमध्ये एकाग्रता, वैचारिक गती व गुणवत्ता वाढीस लागत असल्याचे त्यांनी सांगितले.


विविध गटात विद्यार्थ्यांनी बक्षीस पटकाविले. तर कनिष्ठ श्रेणी- समृद्धी सुनील औटी, ईश्‍वरी साहेबराव शेलार, मास्टर कनिष्ठ श्रेणी- कियान ललित खत्ती, प्रथमस्तर श्रेणी- कृष्णा गोरक्षनाथ बोरकर, द्वितीयस्तर श्रेणी- स्वराज सुनील पालवे, तृतीयस्तर श्रेणी- श्रेया हनुमंत अधोरे, चौथी आणि पाचवीस्तर खुली प्रवर्ग श्रेणी- आयुष राहुल धपाटकर यांनी चॅम्पियन चषकाचे मानकरी ठरले. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण सविता काकडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लकडे यांनी केले. आभार ऋग्विदी कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथस असोसिएशनच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *