जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान
हरदिन आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ समाजात रुजवित आहे -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महासायक्लोथॉन स्पर्धेत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ग्रुप सदस्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, तसेच पोलीस निरीक्षक उमेश परदेशी आदी उपस्थित होते.
ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी सांगितले की, हरदिन मॉर्निंग ग्रुप हे केवळ सकाळच्या व्यायामापुरते मर्यादित नसून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ समाजात रुजविण्याचे काम सातत्याने करीत आहे. विविध आरोग्य चळवळींमध्ये सहभागी होऊन शहरातील नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला जात असल्याची त्यांनी माहिती दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ग्रुप सदस्यांचे अभिनंदन करुन आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उपक्रमात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले. या महासायक्लोथॉनमध्ये ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, तसेच रमेश वराडे, सचिन चोपडा, दिलीप ठोकळ, जहीर सय्यद, दीपक घाडगे, अविनाश जाधव, रतनशेठ मेहत्रे, मनोहर दरवडे, अशोकराव पराते, राजू कांबळे, दीपकराव घोडके, शंकरराव पंगुडवाले, दिनेश शहापूरकर, अनंत सदलापूर, दत्तात्रेय लाहुंडे, जालिंदर अळकुटे, नवनाथ वेताळ आदी सदस्यांनी सहभाग घेतला होता.