• Fri. Mar 21st, 2025

जात प्रमाणपत्रासाठी सहा महिन्याची मुदत वाढ द्यावी -आबासाहेब सोनवणे

ByMirror

Mar 21, 2025

सरपंच परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना अपात्र ठरविले जात असल्याचा मांडला प्रश्‍न

नगर (प्रतिनिधी)- जात प्रमाणपत्रासाठी राज्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना अपात्र ठरविले जात असताना सदर प्रमाणपत्रासाठी सहा महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी सरपंच परिषदेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती सरपंच परिषदेचे राज्य कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे यांनी दिली.


राज्यभरात अनेक ठिकाणी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी जात प्रमाणपत्र वेळेवर देऊनही त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. तर काही सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी जात प्रमाणपत्र वेळेत देऊनही ते प्रमाणपत्र तहसील कार्यालयाने वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक शाखा यांना न पाठवल्याने त्या सर्वांना अपात्र केले जात आहे. जात प्रमाणपत्रासाठी जातपडताळणी समितीकडे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी पाठपुरावा करून देखील वेळेत दिले जात नाही. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी वेळेचे बंधन असल्याने ते वेळेत म्हणजे लवकर मिळणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून वेळेत प्रमाणपत्र न दिले गेल्यामुळे राज्यातील अनेक सरपंच, उपसरपंच सदस्यांना अपात्र करण्यात येत आहे. तरी याप्रकरणी लक्ष घालून तूर्तास किमान सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी व त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र उपलब्ध आहे, त्यांना अपात्र करण्यात येऊ नये अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई येथे केली.

याप्रसंगी सरपंच परिषदेचे राज्य कोअर कमिटी प्रमुख आबासाहेब सोनवणे, सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष विकास जाधव, सरचिटणीस राजू पोतनीस, राज्य प्रसिद्धी प्रमुख संजय बापू जगदाळे उपस्थित होते. तूर्तास कोणालाही अपात्र करु नये, या प्रकरणी योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी अशी मागणी सरपंच परिषदेने मुख्यामंत्र्यांकडे आग्रही मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *