• Fri. Jan 9th, 2026

श्री समर्थ कथा जीवनाच्या अभ्यासक्रमात यावी -श्री अजेय बुवा रामदासी महाराज

ByMirror

Jan 9, 2026

श्री समर्थ कथेच्या समारोपात लोटला जनसागर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “स्वतःला लाभलेल्या आयुष्यात पायी भारतभ्रमण करून श्री समर्थांनी या भारतवर्षामध्ये अध्यात्माचा पाया रचला. पिढ्यांना जुलुमाची गुलामगिरीची जाणीव करून देत उजेडाकडे मार्गक्रमण कसे करावे, याचा विचार श्री समर्थांनी दिल्याने भारताच्या परिवर्तनाची नांदी ठरली. जीवनाला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा बारीक-सारीक विचार करून स्फुरलेले लेखन जगाच्या अंतापर्यंत नवीन पिढ्या घडवत राहणार आहे. अशी श्री समर्थकथा प्रत्येकाच्या जीवनाच्या अभ्यासक्रमात यावी .”असे प्रतिपादन श्री अजेय बुवा रामदासी महाराज यांनी केले.


श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ व रिलायबल इन्व्हेस्टमेंटस्‌ यांच्या माध्यमातून सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या प्रांगणात संपन्न होत असलेल्या श्री समर्थ कथेच्या समारोप सोहळ्याप्रसंगी अंतिम पुष्प गुंफतांना श्री रामदासी महाराज बोलत होते.


सुनील जोशी व सौ वसुधा जोशी यांच्या हस्ते ग्रंथराज दासबोधाचे पूजन संपन्न झाले. संस्थेच्या वतीने रामदासी महाराजांचा स्मृतिचिन्ह पुष्पहार व शाल श्रीफळ प्रदान करून सन्मान करण्यात आला. तीन दिवस कथा सोहळा नियोजनबद्ध व उत्कृष्टरित्या पार केल्याबद्दल सोहळा समितीप्रमुख संजय कुलकर्णी तसेच गायक, वादक व सहकार्य करणारे घटक यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते “श्री समर्थ दर्शन” या समर्थांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले.


रामदासी महाराजांनी भावपूर्णतेने सांगितलेल्या अनेक प्रसंगांनी सर्व दर्शकांच्या डोळ्यात पाणी आले. विविध उपमा, अलंकार ,श्‍लोक, अभंग, रसास्वादाचे सर्व रस जीव ओतून मांडताना मंडपातील हजारो भक्त रोमांचित झाले. स्वतःच्या मांडीवर समर्थांच्या आईने प्राण सोडण्याच्या प्रसंगाने तर भक्तांच्या डोळ्यातून अश्रू थांबेना. स्वतः जवळील मोबाईलला अक्षरश: कोणी हात लावेना अशा दर्जेदार सादरीकरणातून रामदासी महाराजांनी एकेकाचे मन जिंकले. समारोपाची वेळ रात्री आठ वाजेची होती, परंतु दहा वाजले तरी तसेच एकाग्र झालेला एकही समर्थ भक्त हालेना, अशी परिस्थिती झाली.


श्री. संजय व सौ. स्मिता कुलकर्णी परिवार यांच्या शुभहस्ते सोहळ्याच्या समारोपाची आरती संपन्न झाली. उपस्थित समर्थ भक्तांना श्री बुंदी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन विकास सोनटक्के, व्हा.चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, सचिव सुरेश क्षीरसागर, कार्यकारिणी सदस्य ॲड. किशोर देशपांडे, संध्या कुलकर्णी, स्वप्निल कुलकर्णी, सुनील जोशी, स्वाती कुलकर्णी, सौ. रागिणी ओहोळ, प्राचार्या वसुधा जोशी, मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर, मुख्याध्यापक सुनील कानडे, मुख्याध्यापक अजय महाजन, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी, सोशल मीडिया हेड ऋग्वेद कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जिल्हाभरातून हजारो समर्थभक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया डबीर व शारदा होशिंग यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *