• Sat. Apr 4th, 2026

धनगरवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात

ByMirror

Apr 3, 2026

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद व महाआरतीचा लाभ


धार्मिक उपक्रमातून संस्कारित पिढी घडते -आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील धनगरवाडी येथे श्री संकटमोचन हनुमान मंदिर व श्री संकटमोचन हनुमान सेवा ट्रस्टच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांना हजारो भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद व महाआरतीचा लाभ घेतला.


पहाटेच्या शुभमुहूर्तावर झालेला जन्मोत्सव सोहळा विशेष आकर्षणाचा ठरला. मंदिर परिसरात भजन, आरती व धार्मिक विधींच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दुपारी आयोजित महाप्रसादासाठी तब्बल दहा ते पंधरा हजार भाविकांनी उपस्थिती लावली. सायंकाळी पार पडलेल्या महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.


या सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, मंगल भक्त सेवा मंडळाचे राजाभाऊ कोठारी, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप कर्डिले यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे हा उत्सव यंदा अकराव्या वर्षात पदार्पण करत असल्याने त्याचे औचित्य अधिकच वाढले होते.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या माध्यमातून जुन्या व पुरातन मंदिरांचा विकास करण्यात येत आहे. उपनगर व शहरालगत असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार भाविक आणि युवकांच्या पुढाकारातून होत असून, त्यामुळे भक्तांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. श्री संकटमोचन हनुमान सेवा ट्रस्टचे धार्मिक व अध्यात्मिक उपक्रम स्तुत्य असून, अशा उपक्रमांमुळे समाजात संस्कारित पिढी घडण्यास हातभार लागतो. धर्माशी जोडलेली पिढी देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, संकटमोचन हनुमानजींच्या नावाने कार्यरत असलेले हे युवकांचे संघटन भविष्यातही संकट काळात समाजसेवेसाठी तत्पर राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


राजाभाऊ कोठारी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भगवंताच्या कृपेने हे सेवा कार्य अखंडपणे सुरू आहे. एकनिष्ठता आणि समर्पणाच्या भावनेतून ट्रस्ट कार्यरत असून, धर्मासाठी युवकांच्या हातून घडणारी सेवा निश्‍चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *