• Fri. Apr 10th, 2026

निमगाव वाघात रविवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन

ByMirror

Apr 9, 2026

सरपंच कापसे यांच्या अपघाती निधनाने बैलगाडा शर्यत व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द


कावड्यांचे प्रस्थान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त रविवारी (दि.12 एप्रिल) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोमवारी संध्याकाळी करिमशहा वली बाबांचा संदल-उरुस होणार आहे. सरपंच उज्वलाताई कापसे यांच्या नुकतेच झालेल्या अपघाती निधनाने बैलगाडा शर्यत व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून, गावामध्ये दु:खाचे सावट असल्याने दोन्ही उत्सव साध्या पध्दतीने होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी दिली.


नुकतेच गावातील युवकांनी गंगाजल आणण्यासाठी बुधवारी (दि.8 एप्रिल) रात्री पारंपारिक वाद्यांसह मिरवणूकीने कावड घेऊन प्रवरा संगमकडे प्रस्थान केले. यावेळी श्री बिरोबा मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात पै. नाना डोंगरे, देवाचे भगत नामदेव भुसारे, बाबा जाधव, बबन कापसे सहभागी झाले होते.


गावातील युवकांचा जथ्था कावडी घेवून रविवारी यात्रेच्या दिवशी सकाळी 8 वा. गावात परतणार असून, कावडीची गावामधून डफ, ढोल, ताशे व लेझीम पथकासह मिरवणूक काढली जाणार आहे. सकाळी 10 वाजता श्रीबिरोबा महाराजांच्या मूर्तीस गंगाजलाने अभिषेक घालून विधीवत पूजा केली जाणार आहे. सालाबाद प्रमाणे होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. रात्री 9 वाजता छबीना मिरवणूक काढली जाणार आहे.


यात्रेनिमित्त गावातील बिरोबा मंदिराला रंगरंगोटी करुन, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी करिमशहा वली बाबांचा संदल-उरुस होणार आहे. गावातील यात्रा व संदल-उरुसच्या कार्यक्रमातून धार्मिक एकतेचे दर्शन घडणार आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, किरण जाधव, अनशाबापू शिंदे, बाबा पुंड, रामदास वाखारे, पांडूरंग गुंजाळ, संजय डोंगरे, संजय कापसे, ठकाराम शिंदे, अंबादास निकम, मेजर शिवाजी पुंड, संदीप डोंगरे, अनिल डोंगरे, अण्णा जाधव, साहेबराव बोडखे, एकनाथ जाधव, गोकुळ जाधव, राजू शेख, रावसाहेब भुसारे, राजू भुसारे, दिलावर शेख, आदम शेख आदीनी केले आहे. यात्रा उत्सव व संदल-उरुस यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *