• Sun. Jan 25th, 2026

शहरात शिवसेनेच्या वतीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती उत्साहात साजरी

ByMirror

Jan 23, 2026

कार्याने व विचाराने बाळासाहेब ठाकरे जनसामान्यांचे ‘हिंदूहृदय सम्राट’ झाले -सचिन जाधव


बाळासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचा शिवसैनिकांचा संकल्प

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शहरात शिवसेनेच्या वतीने विविध ठिकाणी अभिवादन व कार्यक्रमांचे आयोजन करून हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मंगलगेट येथील शिवसेनेच्या शहर संपर्क कार्यालय तसेच नेता सुभाष चौक येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी “जय भवानी, जय शिवाजी”, “बाळासाहेब ठाकरे अमर रहें” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.


या अभिवादन कार्यक्रमास शिवसेना शहरप्रमुख सचिन जाधव, नवनिर्वाचित नगरसेवक दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, संजय शेंडगे, विक्रम राठोड, सुरेश तिवारी, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, सचिन शिंदे, विजय वडागळे, घनश्‍याम घोलप, महिला जिल्हाप्रमुख ॲड. स्वाती जाधव, सलोनी शिंदे, तृप्ती साळवे, नीता बर्वे, सुनीता बहुले, पुष्पा येळवंडे, प्रताप गडाख, श्‍याम सोनवणे, अनिकेत आरडे, चेतन शिरसूळ, विनोद शिरसाठ, रमेश खेडकर, अभिजीत अष्टेकर, कैलास शिंदे, सुनील लालबोंद्रे, संजय छजलाने, रवी लालबोंद्रे, नरेश भालेराव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शहरप्रमुख सचिन जाधव म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या निर्भीड विचारांनी, स्पष्ट भूमिकेने आणि समाजासाठी केलेल्या कार्यामुळे जनसामान्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. त्यामुळेच ते ‘हिंदूहृदय सम्राट’ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारधारेतून काम करत असून, त्यांचा वैचारिक व राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम ते प्रभावीपणे करत आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचावेत, यासाठी शिवसैनिक जयंती उत्साहात साजरी करत आहेत, असे त्यांनी सांगितले.


महापालिका निवडणुकीदरम्यान राजकारणाच्या वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळाल्या. मात्र, जनतेचा कौल स्वीकारून शिवसैनिक पुन्हा जोमाने समाजहितासाठी कामाला लागले आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या सूत्रानुसार शिवसैनिकांची वाटचाल सुरू असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.


विक्रम राठोड म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच गोरगरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेला ताकद देण्याचे काम केले. त्यांनी सामान्य माणसाच्या हातात सत्ता दिली आणि त्याला नेतृत्वाची संधी उपलब्ध करून दिली. संपूर्ण देशाला ज्वलंत हिंदुत्ववादी विचार देणारे ते एकमेव आणि निर्भीड नेतृत्व होते. कोणत्याही दबावाला न झुकता छातीठोकपणे भूमिका मांडणारे बाळासाहेब ठाकरे आजही करोडो शिवसैनिकांसाठी प्रेरणास्थान आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खरे शिवसैनिक एकवटले असून, शिवसेनेचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *