• Thu. Oct 16th, 2025

रस्त्यासाठी वाळकी ग्रामस्थांचा शिमगा

ByMirror

Oct 26, 2024

वर्षभरापूर्वी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊनही झाली नाही डांबरीकरण

पसरलेली खडी व खड्डयांमुळे रस्त्याची दैना

नगर (प्रतिनिधी)- वर्षभरापूर्वी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन होऊनही; वाळकी-साकत (शिरकांड मळा) रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मार्गी लागत नसल्याने फक्त टाकलेली खडी देखील वाहून गेल्याने रस्त्याच्या दुरावस्थेचा ग्रामस्थांनी शिमगा करुन निषेध नोंदविला. सदर रस्त्यावर टाकलेली खडी वर येऊन व पडलेल्या खड्डयांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बोंबा मारुन रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली.


सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांच्या पुढाकाराने रस्त्याच्या अर्धवट कामाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आप्पासाहेब भालसिंग, लक्ष्मणराव गोरे, राधुजी म्हस्के, श्रीधर बोठे, युवा कार्यकर्ते कदम, कांडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वर्षभरापूर्वी साधारण 4 कि.मी. पर्यंतच्या वाळकी-साकत (शिरकांड मळा) रस्त्याचे काम मार्गी लाऊन उद्घाटन करण्यात आले होते. ठेकेदाराने फक्त दगड व खडी टाकली. मात्र वर्ष उलटून देखील त्यावर डांबरीकरणाची लेयर टाकण्यात आलेली नाही. पावसामुळे टाकलेली खडी देखील वाहून गेल्याने अनेक ठिकाणी खडी साचली असून, विविध ठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरुन जाताना ग्रामस्थांना खडी व खड्डयांचा अंदाज येत नसल्याने वाहने घसरुन पडत आहे. अनेक शाळकरी मुले देखील पडून जखमी झाले असून, वाहनांचे टायर देखील टोकदार खडीमुळे पंक्चर होत आहे. तर आठवडे बाजाराला जाताना महिलांना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. सकाळी जाणाऱ्या दुग्ध व्यावसायिक व शेतकरी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांनी शिमगा करुन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली.


वर्षभरापूर्वी उद्घाटन झालेल्या वाळकी-साकत (शिरकांड मळा) रस्त्याचे डांबरीकरण होणे आवश्‍यक आहे. टाकलेली खडी वाहून गेल्याने पूर्ण रस्त्याची दुरावस्था झाली असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन मंजूर असलेले व अर्धवट सोडून देण्यात आलेल्या सदर रस्त्याचे काम मार्गी लावावे. -विजय भालसिंग (सामाजिक कार्यकर्ते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *