• Tue. Mar 31st, 2026

शरणपूर वृद्धाश्रमात सेवाप्रीतची रामनवमी सामाजिक उपक्रमांनी साजरी

ByMirror

Mar 30, 2026

वृद्धाश्रमात सेवा, स्नेह आणि आनंदाची उधळण; आजी-आजोबांसाठी किराणा, साहित्य व जीवनावश्‍यक वस्तूंची भेट

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने नेवासा तालुक्यातील फत्तेपूर रस्त्यावर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमात रामनवमी उत्सवाचे औचित्य साधत एक आगळावेगळा आणि भावनिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना महिनाभर पुरेल इतका किराणा, फर्निचर साहित्य तसेच व्हील चेअर, वॉकर यांसारख्या जीवनावश्‍यक वस्तू भेट देण्यात आल्या. तसेच ऋणानुबंध ग्रुपने श्रीरामची भजणे गाऊन कार्यक्रमत रंगत आणली.
या उपक्रमाची संकल्पना फाउंडेशनच्या अध्यक्षा जागृती ओबेराय व प्रकल्प प्रमुख गीतांजली माळवदे यांनी साकारली.

वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि स्नेहाने मदत करण्याचा उद्देश यामागे होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर वृद्धाश्रमातील आजी-आजोबांवर फुलांची वृष्टी करून त्यांना सन्मानित करण्यात आले. उपस्थितांनी वृद्धांमध्येच श्रीरामाचे रूप पाहून त्यांची सेवा करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या भजन संध्या कार्यक्रमाने वातावरण अधिक भक्तिमय झाले. फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी सादर केलेल्या श्रीराम भक्तिगीतांनी उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना स्वादिष्ट मिष्टान्न भोजन देण्यात आले. या प्रेमळ आदरातिथ्यामुळे आजी-आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.


जागृती ओबेराय यांनी प्रेम, माया आणि सेवाभाव यांचा संदेश दिला. तसेच जीवनाचे मोल समजून घेण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की, प्रभू श्रीराम हे केवळ देव नसून ते आदर्श जीवनाचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवनातून आपण सेवा, त्याग, कर्तव्य आणि प्रेम यांचे मूल्य शिकतो. आज आम्ही शरणपूर वृद्धाश्रमात आलो आहोत, कारण येथे राहणाऱ्या प्रत्येक आजी-आजोबांमध्ये आम्हाला श्रीरामाचेच रूप दिसते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठे पुण्य आहे. समाजात अनेक वेळा ज्येष्ठ नागरिक एकाकी होतात, त्यांना आधाराची गरज असते. अशा वेळी आपण सर्वांनी त्यांच्याप्रती आपली जबाबदारी ओळखून त्यांना प्रेम, सन्मान आणि आधार देणे अत्यावश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रकल्प प्रमुख गीतांजली माळवदे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. त्यांनी उपस्थित सर्व ज्येष्ठांना आनंदी, समाधानी आणि निरोगी राहण्याचा संदेश दिला तसेच सेवाप्रीत फाउंडेशन त्यांच्या पाठीशी कायम उभे राहील, अशी ग्वाही दिली. व त्यांनी आजोळी आल्यासारखे वाटले असे सांगितले.


या कार्यक्रमाला फाउंडेशनच्या सदस्यांमध्ये सौ. पूजा गंडाळ, सुरेखा बारस्कर, माधवी दांगट, मीरा बारस्कर, दीपाली देऊळकर, दीपा रोहिडा, पूनम आहुजा, स्मिता देशमुख, टीना राकेशकुमार, अंजली गायकवाड, देवयानी गुणे यांची उपस्थिती होती. तसेच शरणपूर वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब मुटकुळे, सचिव सुरेखा मगर, संपर्क प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण, उपसरपंच दत्तात्रय गवते, फत्तेपूरचे सरपंच बाबासाहेब शेख आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *