• Sat. Apr 4th, 2026

ढवळपुरीतील रोजगार सेवकावर निधी अपहाराचा गंभीर आरोप

ByMirror

Apr 4, 2026

रोहयो कामांमध्ये कुटुंबातील सदस्यांसह बोगस नावे टाकून लाखो रुपयांचा गैरव्यवहार?

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथे रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या रोजगार सेवकाने बोगस मजुरांची नावे टाकून तसेच स्वतःच्या नावावरही रक्कम काढून शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे.


समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रार करत संबंधित रोजगार सेवकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, येत्या 15 दिवसांत कारवाई न झाल्यास नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
ढवळपुरी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून येथे रोहयो अंतर्गत विविध कामे सुरू आहेत. या कामांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या रोजगार सेवक घुमटकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ऑनलाईन हजेरी पत्रकांची तपासणी केल्यानंतर अनेक व्यक्ती प्रत्यक्ष कामावर नसतानाही त्यांच्या नावावर हजेरी दाखवून एटीएमद्वारे रक्कम काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये स्वतःचे नाव, कुटुंबातील सदस्यांची नावे तसेच इतर बोगस मजुरांची नावे टाकून निधी काढल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या आईचे नावही हजेरीत टाकण्यात आले असून त्या प्रत्यक्षात बाजारात भाजी विक्रीचे काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.


तक्रारीनुसार, काही वयोवृद्ध व्यक्ती काम करण्याच्या स्थितीत नसतानाही त्यांच्या नावावर हजेरी दाखवण्यात आली आहे. तसेच, काही व्यक्ती रांजणगाव एमआयडीसी येथे नोकरी करत असतानाही त्यांची नावे रोहयोच्या कामांमध्ये दाखवून रक्कम काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


याशिवाय, विहिरींसारख्या विविध कामांवरही मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांची नावे टाकून निधी उचलण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत. घुमटकर यांच्या ताब्यात असलेल्या एटीएम कार्डच्या व्यवहारांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संपूर्ण मजुरांच्या नोंदींची तपासणी करून ज्या-ज्या ठिकाणी गैरव्यवहार झाला आहे, त्या सर्व रकमा संबंधितांकडून वसूल कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.


प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा 15 दिवसांत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यास नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *