महिलांची आरोग्य तपासणी करुन दिले योगाचे धडे
आजची स्त्री सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाने व कार्याने सक्षम बनली -वनिता पुजारी
नगर (प्रतिनिधी)- आंबेडकर फाउंडेशन व समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भुतकरवाडी येथील स्ट्रॉबेरी प्री स्कूलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर महिलांची आरोग्य तपासणी करुन त्यांन निरोगी आरोग्यासाठी योगाचे धडे देण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या शैक्षणिक क्रांतीसह सामाजिक कार्याची माहिती देण्यात आली.
प्रारंभी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी योगशिक्षिका वनिता पुजारी, नगरसेविका वंदनाताई ताठे, समृद्धी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती डोमकावळे, सविता सब्बन, धनश्री काळे, विद्या राजहंस, प्रभा सोनसाळे, लांडगे मॅडम, साठे मॅडम, गुंजाळ, कचरे, पुंड, चव्हाण, दंडवते, चोपडे, साबळे, धोत्रे, सोनवणे, जोशी मॅडम आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनिता पुजारी म्हणाल्या की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाने महिलांना शिक्षणाचा हक्क मिळाला. आजची स्त्री त्यांच्या त्यागाने व कार्याने सक्षम बनली आहे. आज महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देऊन व व्यायामाने सशक्त होऊन समाजाला पुढे घेऊन जाण्याचे त्यांनी सांगितले.
स्वाती डोमकावळे म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी त्यांच्या कार्याचा व विचारांचा जागर होणे आवश्यक आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजासह मुलींना शिक्षणाची दारे खुली करुन दिल्याने समाजाची प्रगती झाली आहे. त्यांचे विचार आजही सर्वांना प्रेरणादायी असून, आज देखील शिक्षणाने सामाजिक, वैचारिक व आर्थिक विषमता दूर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वंदनाताई ताठे यांनी महिलांना बचतीचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.