सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विधाते विद्यालयाचा उपक्रम
विद्यार्थ्यांनी दिला मुलगी वाचवा…मुलगी शिकवाचा संदेश
नगर (प्रतिनिधी)- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कै. दामोधर विधाते विद्यालयाच्या वतीने सारसनगर येथे अभिवादन रॅली काढण्यात आली. पारंपारिक ढोलचा निनाद व मुलींच्या लेझिम पथकाचा डाव रंगला होता. मुलगी शिकली प्रगती झाली…, स्त्री शिक्षणाचा दिवा लावा घरोघरी… तर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमले.
या रॅलीच्या माध्यमातून मुलगी वाचवा…मुलगी शिकवाचा संदेश देण्यात आला. सादर करण्यात आलेल्या लेझीमच्या डावाने उपस्थितांची मने जिंकली. तर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले. सारसनगर परिसरातून मार्गक्रमण होवून सदर रॅलीचे विधाते विद्यालयात समारोप झाला.
रॅलीचा समारोपानंतर शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम पार पडला. प्राचार्या अनुरीता झगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, बाळासाहेब (अण्णा) विधाते, संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, संतोष सुसे आदींसह शालेय विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषणे सादर केली. प्रास्ताविकात सविता सोनवणे यांनी महापुरुषांच्या जयंती उत्सवानिमित्त शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
अनुरीता झगडे म्हणाल्या की, सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे केल्याने महिला विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. विविध उच्च पदावर महिला विराजमान असून, याचे श्रेय सावित्रीबाईंना जाते. मुलींनी उच्च शिक्षण घेवून परिस्थितीपुढे न डगमगता आपले ध्येय गाठण्याचे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लता म्हस्के यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नीता जावळे यांनी करुन दिला. आभार सारिका गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षकांनी परिश्रम घेतले.