ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेले अभंग, विराण्या, अभंग, भारुडांचे स्वरमय सादरीकरण
नगर (प्रतिनिधी)- सप्तसूर फाउंडेशनच्या सदस्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेले अभंग, विराण्या, भक्तीगीत, भारुड असे विविध संगीतमय सेवा नेवासा येथील ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिरात सादर केली. सप्तसूरच्या कलाकारांसह उपस्थित भाविक या भक्तिरंगात न्हाऊन निघाले.
ज्या ठिकाणी बसून संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव असे महान ग्रंथ लिहिले त्या पवित्र ठिकाणी भक्तीरसाचा सूरमय साज चढला होता. भावभक्तीची अमाप ऊर्जा देणारा हा सोहळा श्रोत्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. भक्तीरसात बुडालेल्या अनेकांचे डोळे देखील पाणावले. सप्तसूरचे डॉक्टर कलाकारांनी आपली गाणी अत्यंत भाविकतेने सादर केली.यामध्ये सौ.रेखा जोशी, डॉ. स्मिता तारडे, डॉ. सरोज भिडे, डॉ. हेमा आंचवले, डॉ. दीपा मोहोळे, डॉ. रोहिणी काळे, डॉ. अविनाश वारे, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. शिरीष कुलकर्णी, डॉ. सचिन पानपाटील, डॉ. प्रीती नाईक, सौ. ज्योती दीपक, डॉ. मंजिरी झेंडे, डॉ. ललितराम जोशी, डॉ. रेशमा चेडे यांनी गाणी सादर केली. डॉ संगीता कुलकर्णी यांनी गीतांना अनुसरून अत्यंत अर्थपूर्ण निरूपण सादर केले. वादक कलाकार,तालवाद्य, डॉ. गीता करंदीकर, तबला हर्षद भावे आणि हार्मोनियमला सुनील महाजन यांनी साथसांगत केली. याशिवाय डॉक्टरांचे कुटुंबीयही कार्यक्रमाला उपस्थित होते.
देवाच्या दारात क्षणभर जरी उभे राहिलात तरी मोक्षाभिमुख होत असेल तर, एवढ्या गीतांची सेवा सादर केल्यानंतर सप्तसूरच्या सर्व गायकांना किती धन्य वाटले असेल आणि भावना उपस्थित कलाकारांनी व्यक्त केली. संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी अर्थपूर्ण असे पसायदान येथेच ज्ञानेश्वर माऊलीने आपणाला दिले आहे. विशेष म्हणजे आपल्या शहरापासून एवढ्या जवळ असलेल्या या पवित्र स्थळाला भेट देण्यासाठी अनेक जण पहिल्यांदा आले होते. रेखा जोशी यांच्या पुढाकाराने सर्व सप्तसूर फाऊंडेशनच्या सदस्यांच्या योगदानाने हा कार्यक्रम पार पडला. यासाठी ह.भ.प. म्हस्के महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या सर्व विश्वस्तांचे सहकार्य लाभले.
नेवासा येथील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, भगवान श्री विष्णूचे मोहिनी अवताराला समर्पित असे हे एकमेव मोहिनीराज व महालक्ष्मी यांचे मंदिर येथे आहे. अहिल्याबाई होळकर यांचे सरदार चंद्रचूड यांनी हे मंदिर बांधले आहे. हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील विविध मूर्ती आणि कलाकुसरीने कोरीव दगडी कामने संपन्न असलेल्या या मंदिराला देखील सप्तसूरच्या कलाकारांनी भेट दिली.