हरदिन मॉर्निंग ग्रुपचा सामाजिक उपक्रम; गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसराची स्वच्छता
स्वच्छ परिसर म्हणजे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संत गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक जागृती व जनसेवेचा वसा जोपासला. त्यांच्या विचारांना अभिवादन करत हा उपक्रम राबविण्यात आला.
राष्ट्रीय संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ व अनंत सदलापूरकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सदस्यांनी परिसर स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष कृतीतून सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी दिलीप ठोकळ, जहीर सय्यद, रतनशेठ मेहेत्रे, सर्वेश सपकाळ, सुधीर कपाळे, अविनाश जाधव, दीपकराव घोडके, विलासराव आहेर, अशोक पराते, मुन्ना वागस्कर, निजामभाई पठाण, रामनाथ गर्जे, सखाराम अळकुटे, कुमार धतुरे, अनिलराव हळगावकर, अभिजीत सपकाळ, विनोद खोत, सौरभ रासने, भूषण लंगोटे यांच्यासह हरदिन मॉर्निंग ग्रुपचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता अभियानादरम्यान जॉगिंग पार्क परिसरातील कचरा संकलन करुन प्लास्टिकचा कचरा हटविण्यात आला तसेच स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. सकाळी नियमित व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत सहभाग नोंदवला.
संजय सपकाळ म्हणाले की, “संत गाडगे महाराजांनी केवळ उपदेश दिले नाहीत, तर स्वतः हातात झाडू घेऊन समाजाला स्वच्छतेचा मार्ग दाखवला. आज आपण त्यांची पुण्यतिथी केवळ पुष्पहार अर्पण करून नव्हे, तर त्यांच्या विचारांप्रमाणे कृती करून साजरी करत आहोत. स्वच्छ परिसर म्हणजे निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली, तरच सुंदर आणि सुसंस्कृत समाज घडू शकतो. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता अभियान, वृक्षारोपण-संवर्धन, आरोग्य, व्यायाम आणि सामाजिक उपक्रमांची जोड देत समाजासाठी सकारात्मक कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
अनंत सदलापूरकर म्हणाले की,“संत गाडगे महाराज हे केवळ संत नव्हते, तर ते एक महान समाजसुधारक होते. स्वच्छता, शिक्षण आणि अंधश्रद्धा निर्मूलन या त्रिसूत्रीवर त्यांनी समाजप्रबोधन केले. आजच्या काळात त्यांच्या विचारांची अधिक गरज आहे. सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे हे केवळ प्रशासनाचे काम नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबवून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सदस्यांनी स्वच्छतेचा संकल्प घेत संत गाडगे महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
