मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांमध्ये जागरूकता
भुतकरवाडीत पालकांना मार्गदर्शन; नाव नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलगी शिक्षली तर घर-समाज पुढे जातो -स्वाती डोमकावळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लहान मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षण व विवाहखर्चासाठी सक्षम आर्थिक आधार निर्माण व्हावा या उद्देशाने समृद्धी वुमन्स मल्टीपर्पज सोसायटीच्या पुढाकारातून भुतकरवाडीत विशेष उपक्रम राबविण्यात आला. भारतीय डाक विभागामार्फत सुकन्या समृद्धी योजनेची सविस्तर माहिती उपस्थित पालकांना देण्यात आली. यावेळी मुलगी असलेल्या पालकांची नाव नोंदणीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली.
या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा स्वाती डोमकावळे, तसेच सविता सब्बन, धनश्री काळे, सायली गायकवाड, नाईकवाडे, थोरवे, साबळे, वैद्य, काठे, भुतकर, शेळके, आवटी, गीते, भालके, गुंजाळ, धीवर, निकाळजे, साठे आदी मान्यवर उपस्थित होते. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री-प्रायमरी शाळेत पोस्टमॅन अशोक लगारे यांनी सुकन्या समृद्धी योजनेबाबत सविस्तर माहिती देत योजनेचे फायदे समजावून सांगितले. तसेच डाक विभागाच्या इतर कल्याणकारी बचत योजनांची माहिती देखील नागरिकांना करून देण्यात आली.
केंद्र शासनाने राबविलेल्या या योजनेचा सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना सहज लाभ मिळावा, बचत संस्कृती रुजावी आणि मुलींच्या भविष्यासाठी सुरक्षित आर्थिक कोष उभा राहावा या उद्देशाने समृद्धी वुमन्स मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला होता. वरिष्ठ डाक अधीक्षक विकास पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. उपस्थित पालकांनी मुलींसाठी खाते उघडण्याकरिता नाव नोंदणी केली.
स्वाती डोमकावळे म्हणाल्या की, मुलगी शिक्षली तर घर, समाज आणि राष्ट्र प्रगत होते. मात्र आजही अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींमुळे मुलींच्या उच्च शिक्षणाचा किंवा लग्नाचा खर्च पेलणे कठीण जाते. हीच समस्या ओळखून केंद्र शासनाने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. हा उपक्रम ही मुलींच्या भविष्याची आर्थिक पायाभरणी आहे. सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळावा, हा आमचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे परिसरातील पालकांमध्ये जागरूकता वाढली असून अनेक कुटुंबांनी मुलींसाठी बचत खात्यांची नोंदणी करून सकारात्मक प्रतिसाद दिला.
