संस्कृती मंत्रालय,भारत सरकारच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “भारताचे संविधान हे प्रत्येक नागरिकासाठी सर्व सभावेशक आहे.घटनेने सर्वांना विचार मांडण्याचे व स्वतःचे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे.लोकशाही ही भारताची खरी ताकद आहे.जागतिक पातळीवर भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी असून त्यामध्ये जास्त कलमे आहेत.आपल्या प्रत्येक सकारात्मक कृतीतून आपण भारतीय संविधानाबद्दल आपला अभिमान व आदर दर्शवला पाहिजे”असे प्रतिपादन श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य तथा प्रशालेचे शालेय समिती चेअरमन ॲड. किशोर देशपांडे यांनी केले.
सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या वतीने आयोजित संविधान सप्ताह उपक्रमात ॲड. देशपांडे बोलत होते. प्राचार्या वसुधा जोशी यांच्या संकल्पनेतून संविधान सप्ताहामध्ये संस्कृती मंत्रालय ,भारत सरकारच्या वतीने आयोजित ऑनलाईन उपक्रमामध्ये प्रशालेच्या सुमारे 800 विद्यार्थ्यांनी संविधान उद्देशिकेचे व्हिडिओ पाठवले. त्यांना मंत्रालयाची ऑनलाइन प्रमाणपत्रे प्राप्त झाली. कार्यक्रमामध्ये “संविधान-75” या वैशिष्ट्यपूर्ण विषयांवरील सुमारे 75 पोस्टरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये संविधान निर्मिती प्रक्रिया, सहभागी सदस्य, संविधानातील सुलेखन आणि कला प्रदर्शन, दुर्मिळ व्हिडिओंची क्यू आर कोड मधून माहिती, दुर्मिळ छायाचित्रे, कलमांची माहिती यांचा समावेश आहे. संविधान सेल्फी, प्रश्नमंजुषा, चित्रकला, संविधान उद्देशिका लेखन आदी उपक्रमांचा या सप्ताहात समावेश होता.
विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी व इतर शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी केले. आभार वसंत गायकवाड यांनी मानले. उपक्रमासाठी शिक्षिका चैताली गोरे, शशिकाला नारळे, मेलगर, शेटे, मनीषा अंबाडे तसेच शिक्षक विवेक भारताल, संकेत शिंदे यांनी परिश्रम घेतले.
