• Tue. Oct 14th, 2025

मंगलगेट मच्छी व मटन मार्केटच्या नूतनीकरणाला प्रारंभ

ByMirror

Aug 30, 2025

50 वर्ष जुने मार्केट होणार सुसज्ज


व्यापार टिकला तर बाजारपेठ टिकेल -सचिन जाधव

नगर (प्रतिनिधी)- शहरातील मंगलगेट परिसरातील तब्बल 50 वर्षे जुने मच्छी आणि मटन मार्केट नव्या स्वरूपात उभे राहणार आहे. शिवसेना शहर प्रमुख सचिन जाधव व माजी नगरसेविका सौ. आश्‍विनीताई जाधव यांनी व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी या कामाकरिता निधी उपलब्ध करुन दिला असून, या कामाला नुकतेच प्रारंभ करण्यात आले आहे.


जुने झालेले आणि पावसाळ्यात पाणीगळतीमुळे व्यापारी व ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरलेले हे मार्केट आता सुसज्ज रूप धारण करणार आहे. या नूतनीकरण कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक रफीक मोहम्मद यांच्या हस्ते करण्यात आला. या उद्घाटन प्रसंगी किशोर चव्हाण, योगेश भोकरे, सुरेश नावरे, राजू सांबरे, विनोद सांबरे, ज्ञानेश्‍वर निर्मळ, सागर निर्मळ, राकेश शिनगारे, अक्षय चव्हाण, अविनाश चव्हाण, सचिन कांबळे, विनोद चव्हाण, इमरान मुख्तार, शकील बाबू, फारुक सांडू, रफिक कुरेशी, आरिफ रसूल, हनीफ समीर, अल्तमश शेख, रवी निर्मळ, निसार नजीर, राजू गवते आदींसह परिसरातील व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मागील पाच दशकांपासून मंगलगेट परिसरात असलेले मच्छी व मटन मार्केट कालांतराने जीर्णावस्थेला पोहोचले होते. पत्रे गळकी होऊन पावसाळ्यात संपूर्ण मार्केटमध्ये पाणी साचत असे. त्यामुळे व्यापाऱ्यांना धंदा करणे कठीण झाले होते, तर ग्राहकांना खरेदीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे स्थानिक व्यापाऱ्यांनी वारंवार लक्ष वेधले होते. अखेर शहर शिवसेना प्रमुख सचिन जाधव व माजी नगरसेविका सौ. आश्‍विनीताई जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी निधी मंजूर झाला आणि नूतनीकरणाला सुरुवात झाली आहे. तसेच जाधव यांनी सदर कामाची पहाणी करुन ठेकेदाराला संबंधित कामाविषयी सूचना केल्या.


सचिन जाधव म्हणाले की, मंगलगेट येथील व्यापाऱ्यांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आज या कामाला सुरुवात झाल्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विकास हा केंद्रबिंदू ठेऊन शिवसेना नेहमीच सर्व समाजाला सोबत घेऊन काम करत आहे. पूर्वी मुख्यमंत्री आणि सध्या उपमुख्यमंत्री असताना ना. एकनाथ शिंदे यांनी शहर विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिलेला आहे. व्यापार टिकला तर बाजारपेठ टिकते आणि त्यातून शहराचाही विकास साधला जातो. यासाठी बाजारपेठेत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम सातत्याने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


नूतनीकरणामुळे मंगलगेट मार्केट अधिक सुसज्ज होणार असून, व्यापारी व ग्राहकांना सुरक्षित आणि स्वच्छ जागा मिळणार आहे. पावसाळ्यातील गळती, अस्वच्छता आणि गर्दीच्या समस्यांपासून दिलासा मिळणार आहे. बाजारपेठेतून दररोज शेकडो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्‍न जोडलेला असल्याने हे काम अत्यंत जिव्हाळ्याचे असल्याची भावना स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *