नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम
मैदानावरील खेळाडू जीवनाच्या रणांगणात यशस्वी -काशीनाथ पळसकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस कबड्डी स्पर्धेने साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयात नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचा थरार रंगला होता. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यामध्ये नवनाथ विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या वर्गातील मुलांचा संघ विजयी ठरला.

कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन नवनाथ विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक काशीनाथ पळसकर यांच्या हस्ते झाले. प्रारंभी हॉकीचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, प्र. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, भानुदास लंगोटे, तेजस केदारी, प्रमोद थिटे, तृप्ती वाघमारे, अमोल वाबळे, राम जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे आदींसह शालेय विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काशीनाथ पळसकर म्हणाले की, मैदानी खेळाने शरीर निरोगी राहून खेळाडूवृत्ती वृध्दींगत होते. मैदानावरील खेळाडू जीवनाच्या रणांगणात यशस्वी होत असतो. खेळाने सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक भेद दूर होतात. एकसंघपणे खेळाडू मैदानावर येत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पै. नाना डोंगरे यांनी खेळाने जीवनात यश-अपयश पचविण्याची क्षमता निर्माण होते. खेळाला चांगले दिवस आले असून, ग्रामीण भागातील अनेक खेळाडू यामध्ये करिअर घडवित असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेसाठी तेजस केदारी व प्रमोद थिटे यांनी काम पाहिले. विजेत्या संघास नेहरु युवा केंद्राच्या वतीने स्मृतीचिन्ह व सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.