हल्लेखोरांवर मोक्कातंर्गत कारवाईची मागणी
दलितांवरील भ्याड हल्ले अजिबात सहन केले जाणार नाही -ना. आठवले
नगर (प्रतिनिधी)- जामखेड तालुक्यातील नान्नज येथे रविवारी (दि.24 ऑगस्ट) रात्री रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. सर्व जखमींवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी गुरुवारी (दि.28 ऑगस्ट) पुणे ससून रुग्णालयाला भेट देऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी सर्व जखमींशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
तलवार, कोयते आणि काठ्यांनी सज्ज असलेल्या दहा-बारा गुंडांनी साळवे यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात महिलांसह सर्व कुटुंबीयांना गंभीर दुखापत झालेली आहे. अभिजीत साळवे यांच्यावर पंधरा-सतरा वार करून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. यशदीप साळवे, रत्नमाला साळवे, आदर्श साळवे, रेश्मा साळवे, दिग्विजय सोनवणे व सद्दाम पठाण हे देखील गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी अभिजीत, यशदीप आणि रत्नमाला साळवे यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे.
हल्लेखोर गुंडांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी, सर्व आरोपींना तात्काळ अटक करून भारतीय दंड संहिता कलम 120 (ब) अंतर्गत कट रचल्याचा गुन्हा दाखल करावा, सुनील साळवे व त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे आणि सर्व आरोपींचा मोबाईल सीडीआर तपासून सूत्रधार कोण आहे? याचा शोध घ्यावा आणि त्यास तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दलितांवरील असे भ्याड हल्ले अजिबात सहन केले जाणार नाहीत. हा संतापजनक प्रकार असून मी स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या गुंडांवर मोक्कातंर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिला. या प्रसंगी परशुराम वाडेकर, संजय सोनवणे, आशिष गांगुर्डे, काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, विजय वाकचौरे, महेंद्र कांबळे, शैलेंद्र चव्हाण, महिपाल वाघमारे, शशिकला वाघमारे यांच्यासह रिपाईचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.