रिपब्लिकन पक्षाला उत्तराखंडमध्ये मिळाले यश; नगर जिल्ह्यात महायुतीतून जागा सोडण्याची मागणी
स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा शिष्टमंडळाची ना. आठवले यांच्याकडे आग्रही भूमिका
नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाला उत्तराखंडमध्ये मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करुन होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नगर जिल्ह्यात महायुतीतून रिपब्लिकन पक्षाला अधिक जागा मिळण्याची मागणी करण्यात आली.
या सत्कार सोहळ्यास रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, माजी नगरसेवक राहुल कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, पाथर्डी तालुका अध्यक्ष बाबा राजगुरू, शेवगाव तालुका अध्यक्ष सतीश मगर, नगर तालुका अध्यक्ष अविनाश भोसले, जामखेड तालुका अध्यक्ष शिवाजी साळवे, जिल्हा सचिव गणेश कदम, युवा नेते सिद्धांत दाभाडे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री ना. आठवले रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड झाल्याबद्दल तसेच उत्तराखंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 14 कार्यकर्ते सत्तेत गेल्यामुळे पक्षाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर हा सत्कार करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि रिपब्लिकन पक्ष देशभर पोहोचविण्याचे कार्य रामदास आठवले यांनी प्रभावीपणे केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच पक्षाला सातत्याने राजकीय यश मिळत आहे. उत्तराखंडमधील विजय ही त्याच परिश्रमांची फलश्रुती असून, नगर जिल्ह्यातही पक्ष सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे साळवे यांनी नमूद केले.
जिल्हा शिष्टमंडळाने रामदास आठवले यांच्याकडे नगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीच्या वतीने रिपब्लिकन पक्षाला जागा सोडाव्यात, अशी आग्रही मागणी केली.
