• Thu. Mar 26th, 2026

निमगाव वाघा येथे रमजान ईद उत्साहात साजरी

ByMirror

Mar 25, 2026

हिंदू-मुस्लिम बांधवांचा सहभाग; ऐक्य व बंधुत्वाचे दर्शन


शिरखुर्म्याच्या गोडीतून वाढला सामाजिक सलोखा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. गावातील मशिदीत मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा करून गावाच्या सुख-समृद्धी, शांतता आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. या धार्मिक सोहळ्यानंतर हिंदू बांधवांनी मशिदीत उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. एकमेकांना आलिंगन देत सण साजरा करण्यात आला आणि गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडले.


मौलाना हाफिज अनजर यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, चाँद शेख, प्राचार्य आदम शेख, साहेबराव बोडखे, सलीम शेख, गुड्डू शेख, दिलावर शेख, बाबुराव जाधव, ह.भ.प. एकनाथ महाराज धायतडक, हुसेन शेख, गुलाब शेख, उस्मान शेख, इस्माईल शेख, जालिंदर आतकर, आसिफ शेख, सादिक शेख, आबिद शेख, बख्तार सय्यद, बन्सी शेख, जावेद शेख, मुन्ना पठाण, शाहरुख शेख, बाबुभाई शेख, फिरोज शेख, मयूर काळे, संदीप डोंगरे, हबीब शेख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गावकऱ्यांच्या वतीने पै. नाना डोंगरे यांनी मौलाना हाफिज अनजर यांचा सत्कार करून त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तसेच मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर ग्रामस्थांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन पारंपरिक शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला आणि परस्पर प्रेम व बंधुभाव अधिक दृढ केला.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, “रमजान ईद हा केवळ मुस्लिम बांधवांचा सण नसून, तो आपणा सर्वांच्या एकतेचा आणि बंधुभावाचा सण आहे. निमगाव वाघा गावाची परंपरा ही नेहमीच एकात्मतेची राहिली आहे. येथे सर्व धर्माचे लोक एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होतात, हीच आपल्या गावाची खरी ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *