• Thu. Apr 9th, 2026

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

ByMirror

Apr 8, 2026

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव


रयतच्या शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले संस्कार केंद्र -मनोहर करांडे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. वर्षभर विविध उपक्रमांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.


शाळेमध्ये वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वक्तृत्व, निबंध लेखन, चित्रकला, कथाकथन, हस्ताक्षर स्पर्धा तसेच विविध क्रीडा प्रकार व शैक्षणिक स्पर्धा परीक्षांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.


हा बक्षीस वितरण सोहळा रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर सदस्य तथा माजी उपप्राचार्य मनोहर करांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका लक्ष्मीताई आहेर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनोहर करांडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेला एक संस्कार केंद्र आहे. आज या मंचावर उभे असलेले विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्याला योग्य दिशा देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे.

रयत शिक्षण संस्थेची परंपरा ही ‘शिका आणि समाज घडवा’ या तत्वावर आधारित आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा या शाळेत जपला जात आहे. पालकांनीही मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या गुणवत्तेला वाव द्यावा. शिक्षणाबरोबरच संस्कार आणि क्रीडा यांचेही महत्त्व लक्षात घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, शाळेत वर्षभर विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही प्रगती केली पाहिजे, या उद्देशाने आम्ही सातत्याने उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *