12 जानेवारीला निमगाव वाघा येथे रंगणार मराठी साहित्य संमेलन
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून होणार साहित्याचा जागर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साहित्यिक व कवयित्री सरोज आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन दि. 12 जानेवारी रोजी गावातील परिवार मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडणार आहे.
हे साहित्य संमेलन स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि श्री नवनाथ युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संमेलनामुळे ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत व युवकांना व्यासपीठ मिळणार असून नव्या पिढीला साहित्याकडे वाचन-लेखनाच्या माध्यमातून वळविण्यास हे संमेलन निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे व श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे यांनी दिली.
स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेल्या सरोज आल्हाट या गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी अवघ्या दहाव्या वर्षापासून काव्यलेखनास सुरुवात केली. आजवर त्यांचे अश्रूंच्या पाऊलखुणा, सखे, कविता तुझ्या नि माझ्या, अनन्यता तसेच Imprints of Nature and My Soul (इंग्रजी काव्यसंग्रह) असे पाच काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत.
त्यांनी अनेक मराठी व इंग्रजी मासिकांचे संपादन केले असून मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांतून त्यांचे लेख व कविता नियमितपणे प्रसिद्ध झाल्या आहेत. नुकतेच दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सन्मानित करण्यात आले होते. गेल्या तीन दशकांच्या कालावधीत त्यांनी जिल्हा, विभागीय व राज्यस्तरीय साहित्य संमेलने, कवी संमेलने, परिसंवाद तसेच महिलांसाठीच्या कार्यशाळांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सरोज आल्हाट यांना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी साहित्यिक कार्याची दखल घेऊनच चौथ्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
