• Tue. Jul 22nd, 2025

शहरात बालरोग तज्ञांची मिड टर्म सीएमई परिषदेत बालकांच्या विविध आजारांवर चर्चा

ByMirror

Jul 21, 2025

लहान मुलांवरील अद्यावत उपचार पध्दती, आजारांची लक्षणे, लसीकरण व वर्तन समस्यांवर मार्गदर्शन


बालरोग तज्ञ डॉक्टरांचा सहभाग

नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर बालरोग तज्ञ संघटना आणि महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आयोजित करण्यात आलेली मिड टर्म सीएमई परिषद उत्साहात पार पडली. सावेडी येथील हॉटेल संजोग मध्ये झालेल्या या परिषदेला जिल्ह्यातील बालरोग तज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


मिड टर्म सीएमईचे उद्घाटन राष्ट्रीय बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष डॉ. नितीन शहा, डॉ. प्रमोद जोग, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी डॉ. योगेश पारिख (गुजरात), महाराष्ट्र बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय पाखमोडे, सचिव डॉ. अमोल पवार उपस्थित होते.


डॉ. मेघना चावला यांनी मुलांची उंची वाढविण्यासाठी आहार, व्यायाम यासंदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. संदीप पाटील यांनी झटक्यांच्या पेशंट वरती कसे उपचार करायचे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. लिजा बुलसारा यांनी रक्ताचे रिपोर्ट कशाप्रकारे वाचले पाहिजे आणि उपचार पध्दतीवर प्रकाश टाकला.


नवजात अर्भकांच्या बाबतीमध्ये जन्मतः स्क्रीनिंग चाचणीची गरज यावरती प्रसिद्ध तज्ञ डॉ. प्रदीप सूर्यवंशी व्याख्यान दिले. डॉ. विष्णू बिरादार यांनी मुलांमधील कावीळ या गंभीर प्रश्‍नावर चर्चा केली. मुलांमधील ॲलर्जी विषयी डॉ. विजय वरद आणि डॉ. सिद्धांत ललवाणी यांनी सारखा सारखा होणाऱ्या निमोनिया वरती उपचार पध्दतीबद्दल माहिती दिली.


मुंबई येथील प्रसिद्ध डॉ. नितीन शहा यांनी लसीकरणाबद्दल नवीन व अद्यावत माहिती सांगितली. माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग यांनी औषधांचे प्रीस्क्रीप्शन काळजीपूर्वक लिहिण्याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. रचना मोहिते यांनी लहान मुलांमधील संधिवात आणि त्याचे प्रकार, उपचार पध्दती यावर चर्चा केली. परिषदेत डॉ. प्रताप पटारे यांनी मॉडरेटर म्हणून काम पाहिले. तर एक्सपर्ट म्हणून डॉ. गोपाल बहूरुपी, डॉ. विद्या बांगर आणि डॉ. आदिती देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


डॉ.सुचित तांबोळी यांनी मुलांमधील सर्वसाधारण वर्तन समस्या आणि त्यावरील उपचार पध्दतीवर मार्गदर्शन केले. लहान मुलांमधील हृदयाचे आजार कसे ओळखाचे याची लक्षणे डॉ. रचना साबळे यांनी सांगितले. लहान मुलांमधील लिव्हर ट्रान्सप्लांट यावर डॉ.मनोज श्रीवास्तव तर जनरेशन बीटा चॅलेंजेस यावर डॉ. समीर दलवाई यांनी व्याख्यान दिले.


ही परिषद यशस्वी होण्यासाठी संयोजक डॉ.सचिन वहाडणे, डॉ. सागर वाघ, अहिल्यानगर बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.जयदीप देशमुख, सचिव डॉ. उज्वला शिरसाट, खजिनदार डॉ. संदीप गायकवाड, विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय (विळद) येथील अधिष्ठाता डॉ.सुनील म्हस्के, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ.श्‍याम तारडे, डॉ. चेतना बहुरूपी, डॉ. गणेश माने, डॉ. सुरेंद्र रच्चा, डॉ. मकरंद धर्म आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *