• Fri. Jan 9th, 2026

अरणगाव-वाळकी-बाबुर्डी घुमट रस्त्याच्या पॅचिंगचे काम अर्धवट

ByMirror

Jan 9, 2026

उर्वरित पॅचिंग तात्काळ करा; विजय भालसिंग यांची मागणी


वाहनचालकांचा जीव धोक्यात; दीड ते दोन किमी रस्त्याचे काम रखडले

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथून वाळकी मार्गे बाबुर्डी घुमटकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय बनली होती. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम अर्धवट अवस्थेतच थांबविण्यात आल्याने उर्वरित दीड ते दोन किलोमीटर रस्त्याच्या पॅचिंगचे काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केली आहे.


हा रस्ता अरणगाव, वाळकी, बाबुर्डी घुमटसह परिसरातील अनेक गावांसाठी अत्यंत महत्त्वाचा व एकमेव दळणवळण मार्ग आहे. शहरात ये-जा करण्यासाठी अनेक गावांतील ग्रामस्थ दररोज याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे रस्त्याच्या खराब अवस्थेचा फटका हजारो नागरिकांना बसत आहे.


अरणगाव ते बाबुर्डी घुमट या सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खोल, मोठे व जीवघेणे खड्डे पडले होते. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अक्षरशः धोकादायक बनली होती. दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.


अनेक तक्रारी व पाठपुराव्यानंतर प्रशासनाने तातडीच्या पॅचिंग कामाला सुरुवात केली. मात्र अरणगाव ते शिंदे मळा येथील पुलापर्यंतच पॅचिंगचे काम पूर्ण करण्यात आले असून, उर्वरित भगत मळा ते बाबुर्डी घुमटच्या शिवारापर्यंत रस्त्याचे काम पूर्णपणे थांबले आहे. त्यामुळे जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतराचा रस्ता अजूनही खड्डेमय असून, नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.


रस्त्याचे काम रखडल्यामुळे वाहनचालक, दुचाकीस्वार आणि प्रवासी यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालक घसरून पडून जखमी होत आहेत. दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याशिवाय सततच्या खड्डेमय प्रवासाने मणक्याचे विकार, पाठदुखी, मानदुखी यांसारख्या आरोग्यविषयक समस्या वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.


रस्त्याचे काम अर्धवट ठेवणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. प्रशासनाने तात्काळ उर्वरित दीड ते दोन किलोमीटर रस्त्याचे पॅचिंग पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याचे भालसिंग यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *