• Thu. Oct 16th, 2025

गुरुवारच्या संपात लोकराज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेचा सहभाग

ByMirror

Jun 20, 2024

प्रति दिवस 50 रुपये दंड आकारणीचा निर्णय रद्द करण्याची मागणी

विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- परवानाधारक ऑटो रिक्षांना फिटनेस तपासणी प्रमाणपत्र न घेतलेल्यांना उशिराचा प्रति दिवस 50 रुपये प्रमाणे दंड आकारणीचा निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी लोकराज्य ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.20 जून) होणाऱ्या संपात सहभागी होऊन साखळी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून, शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना देण्यात आले.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामराजे (नागेश) शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील ठाकरे, जिल्हाध्यक्ष सिताराम खाकळ, नगर शहर जिल्हा कार्याध्यक्ष दीपक गुंजाळ, जिल्हा सचिव ईश्‍वर जायभाय, खजिनदार राहुल चौधरी, मयूर गव्हाणे, सोनू चांदणे, सतीश आढाव, मच्छिंद्र शिंदे, किशोर खांडरे, सुशांत बारहाते, संतोष दळवी, गणेश ठोंबरे आदींसह रिक्षा चालक, मालक उपस्थित होते.


फिटनेस तपासणी प्रमाणपत्र न घेतलेल्या परवानाधारक ऑटो रिक्षांना चालक-मालक यांना शासनाकडून दिवासापोटी 50 रुपये दंड आकारले जात आहे. काहींचे अनेक महिन्यांपासून फिटनेस तपासणी प्रमाणपत्र रखडलेले असून, त्यापोटी त्यांना हजारो रुपयांचा दंड आकारला जात आहे. सर्वसामान्य असलेल्या रिक्षा चालकांना हा दंड भरणे अशक्य असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


महाराष्ट्रात परवानाधारक ऑटो रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्याचे कामकाज सुरू करावे, महाराष्ट्र सरकारने ऑटो रिक्षाच्या मुक्त परवान्याचे धोरण बंद करावे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ऑटो रिक्षा चालक मालकांचे रिक्षा पासिंग व इतर कामासाठी स्वतंत्र मदतनीस नेमून त्याचे कामे करण्यासाठी मदत करावी, रिक्षा चालकांची आर्थिकलुट थांबवावी, रिक्षा चालक मालक यांना म्हाडा महामंडळामध्ये 10 टक्के घरकुलासाठी आरक्षण व दारिद्य्र रेशनकार्ड देण्यात यावे, आंध्रा व तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात वयोवर्ष 60 वर्षांपुढील रिक्षा चालक मालक यांना पेन्शन लागू करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *