• Thu. Oct 16th, 2025

पारनेर सैनिक बँक कर्जत शाखा गैरव्यवहार प्रकरणी शाखाधिकारी फरांडे यांना वगळून अक्षम्य चूक

ByMirror

Sep 2, 2023

जिल्हा विशेष लेखापरीक्षकाचा ठपका; 14 संचालकांसह चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोटीस

संबंधित गैरव्यवहाराबाबत हेतूपुरस्कर जाणून-बुजून दखल घेतली गेली नसल्याचे ओढले ताशेरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत बोगस चेक वटवून 1 कोटी 79 लाख रुपयाचां अपहार प्रकरणी पारनेर सहाय्यक निबंधकांनी नेमलेल्या चौकशी समितीने सादर केलेल्या पुरवणी अहवालाकडे दुर्लक्ष करुन व या प्रकरणातील दोषी असलेले कर्जत शाखेचे शाखाधिकारी सदाशिव फरांडे यांना वगळून अक्षम्य चूक करण्यात आली असल्याचा ठपका जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग एक (सहकारी संस्था) अहमदनगर कार्यालयाने ठेवला आहे. तर या गैरव्यवहार प्रकरणी सर्व दोषींवर कारवाई करण्याबाबत संचालक मंडळाच्या सभेत ठराव झाला असताना देखील फरांडे व इतर कर्मचारींवर गुन्हा दाखल झाला नसून, यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने याप्रकरणी 14 संचालकांसह चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना म्हणणे सादर करण्याची नोटीस जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी काढली आहे.


सदर गैरव्यवहार प्रकरणी बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, अरुण रोडे यांनी सहकार आयुक्त निबंध सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयात 5 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81 (3) (क) अन्वये चाचणी लेखापरीक्षण बाबत अर्ज सादर केलेला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने बँकेची योग्य कारवाई करणे बाबत जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांना कळविण्यात आले होते. याबाबत चौकशी करण्यासाठी सुनिल आंग्रे व जितेंद्र काळे यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी 4 जानेवारी 2023 रोजी बँकेत पुरवणी चौकशी अहवाल सादर केलेला आहे. तसेच बँकेच्या संचालक मंडळाची 31 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या सभेच्या ठराव क्रमांक 17 नुसार सर्व दोषींवर कारवाई करणे बाबत सूचित करण्यात आले होते.


सदर चौकशी अहवालावरून चेक ड्राफ्टचे कामकाज पाहणारे लिपिक, पासिंग ऑफिसर दीपक पवार, शाखा अधिकारी सदाशिव फरांडे, खातेदार विशाल पवार यांनी चुकीचे व नियमबाह्य काम करून चेक ड्राफ्ट क्लिअरिंग मध्ये अफरातफर केलेली असून, बँकेची फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. वरील सर्वजण जबाबदार असल्याचे अहवालात स्पष्ट नमुद करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळाच्या ठरावाच्या निर्णयाप्रमाणे सर्व दोषींवर कारवाई करणे बाबत सूचित केलेले असताना फक्त बँकेचे क्लर्क व खातेदार विशाल पवार यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत पारनेर सहाय्यक निबंधक यांच्या 1मार्च रोजीचा चौकशी समितीचा अहवाल डावलून कर्जत शाखेचे तत्कालीन शाखा अधिकारी फरांडे यांना वगळण्याची अक्षम्य चूक झालेली असल्याचे नोटीस मध्ये म्हंटले आहे.


अधिकाराचा गैरवापर करून हेतूपुरस्कर कर्जत शाखेचे तत्कालीन शाखा अधिकारी फरांडे व कर्मचारी पासिंग ऑफिसर दीपक पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बँकेचे संचालक सुदाम कोथंबीरे, बबन दिघे, संतोष यादव यांनी 2 नोव्हेंबर 2021 व 9 नोव्हेंबर 2021 रोजी पाठवलेली तक्रारीचे जवळ जवळ एक वर्षाच्या कालावधीपर्यंत दखल घेतलेली नाही. संबंधित गैरव्यवहाराबाबत तात्काळ दखल घेणे आवश्‍यक असताना जाणून-बुजून दखल घेतली गेले नसल्याचे ताशेरे नोटीसमध्ये ओढण्यात आले आहे.


याप्रकरणी भारतीय दंड संहितेनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात का येऊ नये?, बँकेचे आर्थिक नुकसानीचे संदर्भात महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे मधील प्रावधानानुसार पुढील कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ? हे प्रश्‍न उपस्थित करुन याबाबत लेखी म्हणणे (जबाब) सक्षम पुराव्यासह सोमवारी 4 सप्टेंबर रोजी कार्यालयात उपस्थित राहून सादर करण्याचे जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी नोटीस मध्ये म्हंटले आहे.

पारनेर सैनिक बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, शाखा अधिकारी सदाशिव फरांडे खातेदार पवार यांच्या आर्थिक हितसंबंधातून हा अपहार झालेला आहे. मात्र, लिपिक पदाचे कर्मचारी यात विनाकारण भरडले जात आहे. त्याची जबाबदारी आमच्यावर ढकलण्याचा प्रयत्न सुरु आहे. आंम्ही चारही संचालकांनी दोन वर्षांपूर्वीच चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवले असताना त्यांनी आमच्या तक्रारी कडे पूर्णपणे दुर्लक्ष करत अपहार दडपण्यासाठी प्रयत्न केला. असल्याची भावना विरोधी संचालक सुदाम कोथिंबीरे, बबन दिघे, बबनराव सालके, संतोष यादव यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *