• Fri. Aug 1st, 2025

डायरियावरील लढ्यात ओआरएस आणि झिंक ठरतोय जीवनरक्षक सूत्र!

ByMirror

Jul 26, 2025

डायरियावरील संजीवनी उपाय -डॉ. वसंत खळदकर

भारतीय बालरोग तज्ञ संघटनेची जनजागृती मोहिम

नगर (प्रतिनिधी)- डायरिया हा लहान मुलांमध्ये मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण असून, जागतिक पातळीवरील गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. भारतीय बालरोग तज्ञ संघटनेच्या वतीने (ओरल रिहायड्रेशन सॉल्युशन) व झिंकच्या माध्यमातून डायरियावर जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. ओआरएस आणि झिंक हे डायरियामुळे होणाऱ्या बहुतांश मृत्यू टाळण्यासाठी प्रभावी उपाय आहेत. प्रत्येक पालकाच्या घरात हे जीवनरक्षक उपाय पोहचविण्याचे कार्य सुरु असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वसंत खळदकर यांनी दिली.


ओआरएस म्हणजे काय? ते इतके महत्त्वाचं का आहे? ओआरएस म्हणजे साखर व मीठाच योग्य प्रमाणात बनवलेला द्रावण, जो शरीरातून गळालेला पाणी व क्षारांची भरपाई करतो. डायरियामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी जवळपास 70% मृत्यू हे निर्जलीकरणामुळे (डिहायड्रेशन) होतात.


डब्ल्यूएचओ व लॅनसेट सारख्या संस्थांनी ओआरएसला शतकातील सर्वात मोठी वैद्यकीय क्रांती असे संबोधले आहे. डब्ल्यूएचओ सध्या फक्त ओआरएसचा वापर सुचवतो, जो जलदगतीने सोडियम व पाण्याचे शोषण करतो आणि उलटी, दस्त याचे प्रमाण कमी करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


ओआरएस घरीच तयार करण्याची पद्धत म्हणजे 1 लिटर उकळवून थंड केलेले पाणी घ्या (सुमारे 5 कप), त्यात 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाका. या मिश्रणाला नीट ढवळून पिण्याचे म्हंटले आहे. इतर घरगुती पर्याय म्हणून दालचं पाणी, तांदळाचा माढ़, लिंबूपाणी (कमी साखर व मीठ टाकून), नारळपाणी, मठ्ठा (मीठ टाकलेला), भाज्यांचा सूप यांचा देखील समावेश आहे.


झिंक देखील तितकंच महत्त्वाचं! असून, डब्ल्यूएचओ च्या मार्गदर्शनानुसार 14 दिवस झिंक सप्लिमेंट्स देणे आवश्‍यक आहे. झिंक रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो व पुन्हा डायरिया होण्याचे प्रमाण कमी करतो. लहान बालक जर दूध-पाणी पित नसेल, सुस्त किंवा बेशुद्ध वाटत असेल, रक्तयुक्त स्त्राव दिसत असेल, ताप, सतत झोप घेत असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे डॉ. वसंत खळदकर यांनी म्हंटले आहे.


भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे 45 हजार हून अधिक बालरोगतज्ज्ञ देशभर ओआरएस व झिंक जनजागृतीसाठी कार्यरत आहेत. डायरिया झाल्यास प्रत्येक वेळी ओआरएस वापरणे म्हणजे, आयुष्य वाचवण्यासारखे आहे. जनजागृतीच हे सर्वात मोठं औषध आहे. डायरिया वर नियंत्रण मिळवण्यासाठी घराघरात ओआरएस आणि झिंक पोहोचवणे ही काळाची गरज आहे. यासाठी भारतीय बालरोग तज्ञ संघटनेची मोहिम सुरु करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *