• Tue. Dec 30th, 2025

महापालिकेतील ‘ना-देय’ प्रमाणपत्र मिळवताना सर्वसामान्य उमेदवारांची ससेहोलपट

ByMirror

Dec 24, 2025

उमेदवारांची अडवणूक होत असल्याची तक्रार


आश्‍विनी पाचारणे यांची जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांना निवेदन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेत सध्या अनागोंदी व भ्रष्टाचारयुक्त कारभार सुरू असल्याचा आरोप इच्छुक उमेदवार आश्‍विनी विशाल पाचारणे यांनी केला आहे. येत्या अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आवश्‍यक असलेले ना-देय प्रमाणपत्र मिळवताना सर्वसामान्य उमेदवारांची जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केली आहे.


आश्‍विनी पाचारणे या अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गातून इच्छुक उमेदवार आहेत. उमेदवार तसेच सुचक व अनुमोदक यांना महानगरपालिकेच्या तब्बल 12 विविध विभागांकडून ना-देय प्रमाणपत्र मिळणे बंधनकारक आहे. मात्र, ही प्रक्रिया सर्वसामान्य उमेदवारांसाठी अत्यंत क्लिष्ट व त्रासदायक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पाचारणे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, त्या एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या असून त्यांना कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नाही. त्यामुळे ना-देय प्रमाणपत्रावर संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्या व शिक्के मिळवताना त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, प्रस्थापित राजकीय व्यक्ती व धनाढ्य उमेदवारांना कोणतीही सखोल पडताळणी न करता तात्काळ ना-देय प्रमाणपत्र दिले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.


विशेष म्हणजे, ज्यांचे अर्ज आवक नोंदीमध्ये नंतर नोंदविण्यात आले आहेत, अशा उमेदवारांनाही आधी प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत अधिकारी ‘अर्ज सापडत नाहीत’ अशी बेजबाबदार उत्तरे देत असल्याचा आरोपही पाचारणे यांनी केला आहे.


प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 2 येथे आपल्या समोरच दोन वेळा असा प्रकार घडल्याचे त्यांनी नमूद केले असून, यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहे. या ठिकाणी अनेक सर्वसामान्य उमेदवारांनी तोंडी तक्रारी केल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित अधिकारी तसेच उपायुक्त यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकारात महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच आयुक्त यांचा सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.


या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आश्‍विनी पाचारणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना ई-मेलद्वारेही तक्रार पाठविण्यात आली आहे. वेळेत उमेदवारी अर्ज दाखल होऊ न शकल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या सर्व न्यायालयीन बाबींची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *