• Wed. Jul 2nd, 2025

अधिकृत ट्रस्टला मोरम उत्सव पारंपरिक व रितीरिवाजाप्रमाणे साजरी करण्यास परवानगी मिळावी

ByMirror

Jul 12, 2024

बारा इमाम कोठला ट्रस्टच्या शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

ट्रस्टच्या विरोधात दावा दाखल केलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये; ट्रस्टची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- दरवर्षीप्रमाणे बारा इमाम कोठला येथे अधिकृत ट्रस्टला मोरम उत्सव पारंपरिक व रितीरिवाजाप्रमाणे साजरी करण्यास परवानगी मिळावी व ट्रस्टच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केलेल्या व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांकडून या उत्सवामध्ये गालबोट लावण्याची शक्यता असल्याचा आरोप करुन त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये, या मागणीसाठी बारा इमाम कोठला ट्रस्टच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दस्तागिर बडेसाहेब सय्यद, शकुर शेख, जुबेर सय्यद हुंडेकरी, निसार सय्यद बडेसाहब, नजीर खान, मुजावर सय्यद राफा वहिदअली, साजिद सय्यद, खालिद सय्यद आदी उपस्थित होते.


दर्गा हजरत पीर बारा इमाम कोठला ही संस्था व वक्फ अधिनियम 1995 चे कलम 13 अन्वय नोंदणीकृत संस्था असून, ही संस्था सुरुवातीस धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत झालेली होती. सदरहू संस्थेची धर्मदाय आयुक्त पुणे यांची सन 1981 साली घटना मंजूर केलेली आहे. संस्थेचे कामकाज घटनेप्रमाणे चालत आहे. अनेक वर्षापासून सय्यद वाहिद अली हमीद अली हे मुजावर म्हणून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम पाहत होते. त्यानंतर त्यांचे मुले वंशपरंपरागत काम पाहत आहे व न्यासाची देखभाल देखील करत आहे.


न्यासाचे कामकाज घटनेप्रमाणे 2020 साली न्यासाचे विश्‍वस्त म्हणून सय्यद बडेसहाब जहागीरदार व त्यानंतर सय्यद दस्तगीर बडेसाहब जहागीरदार व इतर घटनेप्रमाणे काम पाहत होते. त्यानंतर दस्तगीर बडेसहाब जहागीरदार व इतर यांनी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ (औरंगाबाद) यांच्याकडे वक्फ अधिनियमान्वये बदल अर्ज दाखल केला होता. तसेच सय्यद इलियास इसामुद्दीन यांनी देखील बदल अर्ज दाखल केला होता. बदल अर्जाची चौकशी अंती सय्यद बडेसहाब जागीरदार (मयत) यांनी सादर केलेला फेरबदल अर्ज मध्ये सय्यद निसार बडेसाहब जहागीरदार यांचा समावेश असल्याने त्यांचा अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने आदेश पारित केलेला होता. परंतु सय्यद इलियास इसामुद्दीन यांचा न्यासाशी काही संबंध नसताना नमूद अर्जदाराचे मंजूर झालेले बदल अर्जाला त्यांनी आव्हान दिले होते.


मुख्याधिकारी वक्फ मंडळ (औरंगाबाद) यांनी सय्यद इलियास इसामुद्दीन यांचे विश्‍वस्त म्हणून नाव नसल्याने त्यांचा अर्ज रद्द केला होता. सदर प्रकरणाबाबत मुंबई खंडपीठाच्या औरंगाबाद उच्च न्यायालयात सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीदेखील सय्यद इलियास इसामुद्दीन हे नेहमी ज्ञासाच्या घटनेविरुद्ध सुरुवातीपासून काम करत आहे व न्यासाच्या अडथळा उपस्थित करीत असल्याचा आरोप ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे. सदर व्यक्तीने वेळोवेळी वेगवेगळ्या न्यायालयात दावे दाखल केले होते, मात्र न्यायालयाने ते फेटाळले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


सदर व्यक्तीकडे मोठा जामजमाव असून, त्यांच्याकडून मोहरम उत्सवाच्या कार्यक्रमात शांतता भंग करुन गालबोट लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर इसम प्रशासनाची दिशाभूल करून माध्यमांना खोटी माहिती देऊन प्रशासनाची दिशाभूल करीत आहे. अशा व्यक्तींना न्यासाकडून मोहरम उत्सव साजरा करण्यास व देखभाल करण्याची कोणतीही परवानगी देऊ नये, दरवर्षी ट्रस्टच्या माध्यमातून विश्‍वस्त व मुजावर यांच्या सहाय्याने मोहरम उत्सव शांततेत पारंपरिक व रितीरिवाजाप्रमाणे मोहरम उत्सव साजरा केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *