नामफलकाचे जिल्हा प्रवासी संघटनेच्या वतीने स्वागत
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहराचे नामांतर 31 मे 2023 रोजी अधिकृतरीत्या अहिल्यानगर असे करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होत गेली आणि अखेर 2025 च्या शेवटच्या तिमाहीत रेल्वे स्थानकाचे नामांतरही अधिकृतरीत्या करण्यात आले. जानेवारी 2026 मध्ये रेल्वे स्थानक व प्लॅटफॉर्मवरील सर्व फलकांवर “अहिल्यानगर” हे नाव झळकू लागले आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी रेल्वे स्थानकावर एकत्र येत नव्या नामफलकास पुष्पहार अर्पण केले. यावेळी जिल्हा प्रवासी संघटनेचे सदस्य हरजीतसिंग वधवा, रेल्वे बोर्डचे अध्यक्ष सुद्र महाजन, रेल्वे बोर्डचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक, अशोक कानेडे, बाळासाहेब गायकवाड, संदेश रपारिया, साहेबराव विधाते, अनिरुध्द पुरकर आदी उपस्थित होते.
शहराच्या अस्मितेशी जोडलेला हा क्षण नागरिकांसाठी अभिमानाचा ठरत आहे. “अहिल्यानगर” हे नाव आता अधिकृतपणे रेल्वे स्थानकावर झळकत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे. तर हा केवळ नामफलक बदल नाही, तर इतिहास आणि परंपरेचा सन्मान असल्याची भावना जिल्हा प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी व्यक्त केली.
