गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार निसर्गाचे संरक्षण आणि लोकशाहीचे सशक्तीकरण करणे काळाची गरज -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- महात्मा गांधीजींनी जगाला सत्य, अहिंसा आणि स्वराज्याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमध्ये निसर्गाशी आणि लोकशाहीशी भागीदारीचा मोठा वाटा होता. आज, पर्यावरणाचे संकट आणि लोकशाहीतील विसंगती पाहता, गांधीजींच्या तत्त्वज्ञानानुसार निसर्गाचे संरक्षण आणि लोकशाहीचे सशक्तीकरण करणे काळाची गरज आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार असल्याची भावना पीपल्स हेल्पलाईनचे ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली.
पुढे ॲड. गवळी म्हणाले की, निसर्गाशी भागीदारी आणि गांधीजींचे विचार- गांधीजींनी स्वावलंबन आणि निसर्गस्नेही जीवनशैली यावर भर दिला. गांधीजींच्या स्वदेशी तत्त्वज्ञानानुसार, आपण स्थानीय संसाधनांवर अवलंबून राहावे आणि निसर्गाची जपणूक करावी. आज पावसाच्या पाण्याचे संवर्धन (रेनगेन बॅटरी), सुजलाम-सुफलाम भारत, आणि धनराई (कोरडवाहू बागायती शेती) यांसारख्या संकल्पना या विचाराशी सुसंगत आहेत.
औद्योगिकरणाने निसर्गाची हानी होऊ नये यासाठी स्थानीय, नैसर्गिक आणि टिकाऊ साधनसंपत्ती यांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. जंगलतोड, हवामानबदल, जलसंकट यावर उपाय म्हणून निसर्गपाल जीवनशैली स्वीकारली पाहिजे. अहिंसा म्हणजे फक्त शारीरिक हिंसा टाळणे नव्हे, तर निसर्गावर होणाऱ्या अन्यायाला विरोध करणे देखील अहिंसा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गांधीजींच्या लोकशाही तत्त्वांनुसार, लोकशाही म्हणजे फक्त मतदान करणे नव्हे, तर लोकांनीच सत्ता हाताळणे. सर्वोदय म्हणजे सर्वांचा विकास हा गांधीजींचा लोकशाहीचा गाभा होता. मतदान फक्त एक दिवसाचे कर्तव्य नसून लोकांनी दररोज प्रशासनात सक्रिय सहभाग घ्यावा. गांधीजींनी सांगितले की सत्य आणि अहिंसा हे लोकशाहीच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे आहेत. भ्रष्टाचाराविरोधात आणि सरकारच्या योजनांवर लोकांनी सतत नजर ठेवावी. ग्रामस्वराज्य हा खरा लोकशाहीचा पाया आहे, जिथे गावाला स्वतःच्या विकासाचे निर्णय घेता आले पाहिजे. पीपल्स बजेटिंग प्रणालीद्वारे लोकांनी सरकारी निधीचा वापर ठरवला पाहिजे. लोकांनी कायदेविषयक निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हावे, जसे गांधीजींनी सांगितलेल्या तत्व प्रणालीचा अंमल होण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे.
जसे निसर्ग संवर्धन गरजेचे आहे, तसेच लोकशाहीचे रक्षण महत्त्वाचे आहे. जसे रेन गेन बॅटरीने भूजल वाढवते, तसेच पारदर्शक लोकशाही समाजात विश्वास वाढवते. जसे जैवविविधता इकोसिस्टमला संतुलित ठेवते, तसेच लोकसहभाग लोकशाहीला सक्षम बनवतो. लोकशाही धोक्यात आहे आणि निसर्गाचा ऱ्हास वेगाने होत आहे. गांधीजींच्या तत्त्वांवर आधारित निसर्गसंवर्धन आणि लोकशाही बळकटीकरण हेच यावर उपाय आहेत. जर आपण खरोखर गांधीजींना श्रद्धांजली अर्पण करू इच्छितो, तर ही तत्त्वे आत्मसात करून त्यांचे विचार कृतीत आणण्याचे ॲड. गवळी यांनी आवाहन केले आहे.