निसर्गधर्म म्हणजे केवळ श्रद्धा नव्हे, तर पर्यावरण रक्षणाची राष्ट्रधर्मवृत्ती; पीपल्स हेल्पलाईनचा दावा
निसर्गाशी सुसंगत जीवनशैलीचा संविधानिक गौरव व्हायला हवा -ॲड. कारभारी गवळी
नगर (प्रतिनिधी)- भारतातील आदिवासी समाजाची निसर्गाशी असलेली नाळ, श्रद्धा, जीवनपद्धती आणि मूल्यव्यवस्था ही निसर्गधर्माचे मूळ स्वरूप आहे. आज देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील एक महिला विराजमान झाल्याने या निसर्गधर्माला ऐतिहासिक राष्ट्रपातळीवरील मान्यता प्राप्त होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन पीपल्स हेल्पलाइनचे ॲड. कारभारी गवळी यांनी केले.
निसर्गधर्म, आदिवासी संस्कृती आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाचा विशेष उल्लेख करताना ॲड. गवळी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आदिवासी समाजाचे जीवन निसर्गाशी घट्ट जोडलेले आहे. डोंगर, नद्या, झाडे, प्राणी हे त्यांच्यासाठी पूजनीय आहेत. मंदिराच्या भिंतींऐवजी ते झाडाखाली, तळ्याजवळ, डोंगरकड्यावर उपासना करतात. त्यांच्या श्रद्धा कोऱ्या लिखित ग्रंथांवर नव्हे, तर अनुभव आणि नैसर्गिक नियमांवर आधारित असतात. यामुळेच त्यांचा धर्म निसर्गधर्म आहे. जो पर्यावरण पूरक, शाश्वत आणि मानवी सहअस्तित्वावर आधारित असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.
भारतीय इतिहासात प्रथमच आदिवासी समाजातील एक महिला श्रीमती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या आहेत. त्यांचे जीवन आदिवासी मूल्यांशी सुसंगत आहे. साधेपणा, निसर्गप्रेम, समाजसेवा, आणि निसर्गाशी असलेली श्रद्धा. त्यामुळे त्यांचे राष्ट्रपतीपद ही केवळ सामाजिक किंवा राजकीय घटना नसून निसर्गधर्माला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठा बहाल करणारी क्रांतीकारी घटना असल्याचे पीपल्स हेल्पलाईच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
निसर्गधर्म आणि भारतीय संविधानावर बोलताना ॲड. गवळी यांनी भारतीय संविधानामध्येही निसर्गधर्माला स्थान मिळू शकते: अनुच्छेद 25 व 26 धर्म स्वातंत्र्य व प्रचाराचा अधिकार देतात. अनुच्छेद 29 व 30 अल्पसंख्यांकांना शैक्षणिक संस्था स्थापनेचा अधिकार देतात.अनुच्छेद 51(अ)(ग) निसर्ग संवर्धनाचे कर्तव्य सांगतो, जे निसर्गधर्माचे मूळ तत्व आहे. यामुळेच निसर्गधर्म हा भारतीय संविधानाच्या चौकटीत स्वतंत्र धर्म म्हणून ओळख मिळवू शकतो, असे मत त्यांनी मांडले आहे.
निसर्गधर्म स्वतंत्र धर्म अस्तित्वात येण्यासाठी निसर्गधर्माला राष्ट्रपतींच्या माध्यमातून राष्ट्रीय व्यासपीठ मिळू शकते. शैक्षणिक धोरणात समावेशाने निसर्गमूल्यांवर आधारित शिक्षण प्रणाली तयार होऊ शकते. अल्पसंख्याक दर्जाने निसर्गधर्मीय समाज स्वतंत्र संस्था स्थापन करू शकतो. संविधानिक मागणीची दिशा म्हणून निसर्गधर्माला स्वतंत्र धार्मिक ओळख मिळवून देण्यासाठी जनचळवळ उभारता येणार आहे
राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिनिधित्व हे केवळ आदिवासी समाजापुरते मर्यादित नसून, निसर्गप्रेम करणाऱ्या, पर्यावरण रक्षणासाठी जगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे आता वेळ आली आहे की निसर्गधर्माला केवळ आंतरिक श्रद्धा म्हणून नव्हे, तर संविधानिक अधिकार आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून द्यावी. ही लढाई केवळ एका धर्माची नाही, तर भविष्यातील पर्यावरणीय संतुलन आणि मानवी अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या मूल्यांची प्रतिष्ठा असल्याचे असल्याचे म्हंटले आहे.