लहानपणीची लठ्ठपणा वाढता आरोग्यराक्षस
लहानपणीचा लठ्ठपणा हा एक जागतिक महामारीचा चेहरा -डॉ. वसंत खळदकर
नगर (प्रतिनिधी)- लठ्ठपणा ही आता भविष्यातील नव्हे तर सध्याचीच धोकादायक समस्या बनली आहे. पूर्वी फक्त श्रीमंत समाजांची ही चिंता मानली जात होती, पण आता लहानपणीचा लठ्ठपणा हा एक जागतिक महामारीचा चेहरा घेत आहे, जो सर्व सामाजिक स्तरांतील कोट्यवधी मुलांना प्रभावित करत आहे. या संकटाशी लढण्यासाठी व समाजात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय बालरोग तज्ञ संघटनेच्या वतीने वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस ही देशव्यापी जनजागृती मोहिम सुरु करण्यात आली असल्याची माहिती भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. वसंत खळदकर यांनी दिली.

वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2023 नुसार, जर सध्याचे प्रमाण असेच चालू राहिले तर 2035 पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या लठ्ठ किंवा जास्त वजनाची असू शकते. यातील 90% पेक्षा अधिक प्रकरणे जीवनशैलीशी संबंधित असून, चुकीचे आहार पद्धती, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता स्क्रीन टाइम हे याचे मुख्य कारण आहेत. लठ्ठपणा हा केवळ वजनाचा प्रश्न नाही, तो भविष्यातील आरोग्य संकटाचा इशारा आहे. कृती करण्याची वेळ आता आली आहे,
भारतीय बालरोग तज्ञ संघटनेच्या वतीने बालमुलांमधील लठ्ठपणा रोखण्यासाठी लठ्ठपणा वाढीचे निरीक्षण, बीएमआय मोजणी आणि कंबर मोजमाप, तसेच दिशा 2-यू टर्न या नावाने तयार केलेली शॉर्ट फिल्म, जी यू ट्युबवर उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून पालक आणि लहान मुलांमध्ये जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लठ्ठपणा रोखण्यासाठी एबीसीडी सूत्र स्विकारण्यात आली आहे. (ए) आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा, (बी) वाढीच्या चार्ट्सचा वापर करा, (सी) शाळा आणि समाजात जनजागृती निर्माण करा आणि (डी) आहारविषयक गैरसमज दूर करा याचा समावेश आहे. प्रतिबंध ही सामूहिक जबाबदारी आहे. पालक, शाळा, डॉक्टर आणि धोरणकर्ते यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बालकांमध्ये लठ्ठपणामुळे निर्माण होणारे मानसिक परिणाम जसे की स्वतःविषयी हीन भावना, एकटेपणा, किंवा सामाजिक कटाक्ष ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत. ज्या मुलांमध्ये गुंतागुंतीची लक्षणे दिसून येतात त्यांना तातडीने तज्ज्ञांकडे पाठवणे महत्त्वाचे आहे. लठ्ठपणाकडे खरी धोकादायक समस्या समजून, तत्परता, सहानुभूती आणि शिक्षणाने त्याला सामोरे जाण्याची गरज असल्याचे डॉ. वसंत खळदकर यांनी म्हंटले आहे.
प्रत्येक कुटुंबातील पालकांना मुलांसाठी संतुलित आहार, विशेषतः नाश्ता नियमित द्या, दररोज किमान 45 मिनिटे शारीरिक व्यायाम प्रोत्साहित करा, स्क्रीन टाइम 1 तासापेक्षा कमी ठेवा आणि अत्यंत डाएटिंग आणि अतिस्नॅकिंग टाळण्याचे आवाहन भारतीय बालरोग तज्ञ संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.