ऑलंपिकवीर ध्यानचंद यांना अभिवादन; डोंगरे संस्था, व्यायामशाळा व युवा मंडळांचा सहभाग
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पै. नाना डोंगरे व्यायाम शाळा, नगर तालुका तालिम सेवा संघ, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ऑलंपिकवीर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला अंबादास दूध संकलन केंद्राचे चेअरमन भाऊसाहेब जाधव, हुसेन शेख गुरुजी, नवनाथ जाधव, दत्तू शिंदे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, प्रणित गायकवाड, बापू सुंबे, बापू पुंड, बाळू जाधव, राजू भुसारे, राजू शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, क्रीडांगणात घाम गाळणारा खेळाडू केवळ आपले नाव उज्ज्वल करतो असे नाही, तर गाव, तालुका, जिल्हा व अखेर देशाचा गौरव वाढवतो. ऑलंपिकवीर ध्यानचंद यांचे जीवन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी साधेपणातून, शिस्तीतून व क्रीडावृत्तीच्या जोरावर जगभरात भारताचा झेंडा फडकवला. त्यांची जिद्द, मेहनत आणि खेळावरील निष्ठा आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आपल्या गावात अनेक मुलांमध्ये उत्तम खेळाडू होण्याची क्षमता आहे. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन, सुविधा व शिस्त मिळणे आवश्यक आहे. व्यायामशाळा, तालिम, व युवा मंडळ हाच उद्देश घेऊन कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावेळी गावातील युवकांना मैदानी खेळ खेळण्याचे आवाहन करण्यात आले.