बाबासाहेबांनी देशातील दलितांचा उद्धार करुन समता प्रस्थापित केली -शिवाजीराव साळवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मार्केटयार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून बाबासाहेबांना मानवंदना दिली.
याप्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, जिल्हा सचिव माणिकराव नवसुपे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हैसमाळे, प्रदेश युवक कार्यकारिणी सदस्य कैलास गांगर्डे, जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव बोरुडे, बाबासाहेब लोहकरे, बापूसाहेब देवरे, विठ्ठलराव जयकर, रामकिसन साळवे (मेजर), युवक शहराध्यक्ष अतुल देव्हारे, दुर्वेश शेलार, बाबासाहेब सोनवणे, लक्ष्मण साळे (मेजर), अभिजीत शिंदे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर इतर जातींना कदाचित मोठा फरक जाणवला नसता, परंतु दलितांचे जीवन प्राण्यांपेक्षा कठीण झाले असते. बाबासाहेबांनी सर्व भारतातील दलितांचा उद्धार करून त्यांना मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. त्यांचे कार्य एका जातीपुरते किंवा वर्गापुरते नव्हते; ते संपूर्ण मानवतेसाठी दिशादर्शक होते.
साळवे पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी महिलांना हक्क दिले, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले, कामगारांना अधिकार दिले. भारतीय राज्यघटनेद्वारे त्यांनी समानतेचा पाया रचला. त्यांच्या विचारांमुळे आज देशातील दुर्लक्षित घटक मुख्य प्रवाहात येत आहेत. महापरिनिर्वाण दिन हा त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
