ज्येष्ठ संगीत रसिक धनेश बोगावत यांच्या संकल्पनेतून रंगली भावसंगीत संध्या
नगर (प्रतिनिधी)- शहराच्या सावेडी येथील माऊली सभागृहात झालेल्या मराठी भावसंगीताचा सुवर्णकाळ या मैफलीने नगरकर मंत्रमुग्ध झाले. शहरातील ज्येष्ठ संगीत रसिक धनेश बोगावत यांच्या संकल्पना आणि निर्मितीतून निर्माण झालेल्या या कार्यक्रमाचे दिग्दर्शन मिलिंद कोलते यांनी केले होते. मराठी भावसंगीताचा सुवर्णकाळ या मैफलीत मराठी गाण्यांचा आणि निवेदनाद्वारे उलगडलेल्या त्या काळातील आठवणींने नगरकर मराठी संगीताच्या सुवर्णकाळातील भावविश्वात रममाण होत एक अनोख्या मैफलीचा आनंद लुटला.
गाण्यांच्या निवडी पासून रंगमच व्यवस्था, ध्वनी- प्रकाश योजनेपर्यंत सर्वच आघाड्यांवर दोघांनी विशेष लक्ष देत मैफलीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या मैफलीला ख्यातनाम संगीत संयोजक विवेक व केदार परांजपे यांच्या दर्जेदार वाद्यवृंदाची साथ मिळाली. हा कार्यक्रम बांधकाम व्यावसायिक स्व. जवाहर मुथा यांना समर्पित करण्यात आला होता. सुरुवातीला स्व. मुथा यांच्या जीवप्रवासावर ध्वनी चित्रफित दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मैफलीची सुरुवात संपदा चौधरी यांच्या तुझ्या कांतीसम रक्तपताका या भक्तिगीताने करण्यात आली. त्यापाठोपाठ रेणुका पवार यांचे कुणी पाय नका वाजवू, बाई मी विकत घेतला शाम आणि प्रसाद शेटे यांचे तुझे गीत गण्यासाठी या भावगीताने मैफलीची रंगत भरत असतानाच सूर नवा ध्यास नवाची विजेती नगरकन्या सन्मिता शिंदे यांच्या एका तळ्यात होती या भावस्पर्शी गाण्याने मैफल टिपेला जाऊन पोहोचली. त्यानंतर एक से बढकर गाण्यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवत मैफल उत्तरोत्तर बहरत गेली. मिलिंद कोलते आणि सन्मिता शिंदे यांच्या गोमू संगीत नं या युगुलगीताने प्रेक्षकांकडून वन्स मोअर मिळवला.
अजय दगडे आणि संपदा चौधरी यांचे संधिकाली या अशा हे युगुलगीत, मानसोपचार तज्ज्ञ डॉ नीरज करंदीकर यांचं तुला पहिले मी नदीच्या किनारी आणि प्रसाद शेटे यांच्या तोच चंद्रमा नभात या एकल प्रेमगीताने रसिकांच्या मनातील आठवणींचा कप्पा जागा केला. प्रसाद शेटे यांच्या गायकीत सुधीर फडके यांची झलक आल्याची दाद प्रेक्षकांकडून मिळाली. केतकीच्या बनी आणि उघड्या माझ्या जखमा पुन्हा जाहल्या या गझल वजा गाण्यातून सन्मिता शिंदे यांच्या रसिकांना भावना विवश केले.
मध्यंतरानंतर उडत्या चालीची आणि द्रुत लयीची गाणी सादर झाली. त्यामध्ये एकाच या जन्मी जणू, रात्रीस खेळ चाले, शुक्रतारा मंद वारा, मी डोलकर सारखी सदाबहार गीतं सादर करण्यात आली. उत्तरार्धतातील मिलिंद कोलते यांचं लाजून हसणे, डॉ. नीरज करंदीकर यांचं पाहिले न मी तुला, सन्मिता शिंदे यांची जाळीमंदी पिकली करवंद आणि अजय दगडे यांची अग नाच नाच राधे ही गवळण विशेष लक्ष वेधून गेली. मैफलीचा समारोप स्वा. सावरकर यांच्या ने माजसीने या गीताने झाला. त्याआधी ज्ञानेश कुलकर्णी या गीताची पार्श्वभूमी सांगताना सभागृहात रोमांचित शांतता पसरली होती. सर्व प्रेक्षकांनी या गीता बरोबर कोरस साथ दिली.
या बहारदार मैफलीचे निवेदन ज्येष्ठ निवेदिका डॉ. स्मिता केतकर आणि सीए ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले. माहितीपूर्ण आणि रंजक पद्धतीने आपल्या विशेष शैलीत निवेदन करत दोघांनी प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवले. मध्यंतरामध्ये धनेश बोगावत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व प्रायजकंचे आभार मानात पुढील कार्यक्रमाची घोषणा केली. त्यावेळी चारुता शिवकुमार यांनी निवेदन केले. मैफलीच्या शेवटी मिलिंद कोलते यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम संपतताना सर्व प्रेक्षकांनी एका अभूतपर्व मैफिलचे साक्षीदार झाल्याची भावना व्यक्त केली.