गुरु तेग बहादुर शहिदी व गुरु गोबिंदसिंग गुरुतागद्दीच्या 350 व्या शताब्दीनिमित्त पंजाब येथून आगमन
बाबाजींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
नगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील भाई कुंदनलालजी गुरुद्वारा, अमृतवेला-बाबा सिरचंद महाराज गुरुद्वारा, गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान व जनक आहुजा परिवाराच्या वतीने गुरु तेग बहादुरजींच्या शहिदी आणि श्री गुरु गोबिंदसिंग यांच्या गुरुतागद्दीच्या 350 व्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात दाखल झालेल्या नगर-कीर्तनाचे टॉप अप पेट्रोल पंप येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.
पारंपरिक पंजाबी ढोलच्या निनादात व फुलांच्या वर्षावात नगर-कीर्तनाचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याने संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. नगर-कीर्तनातील मुखी शिरोमणी पंथ अकाली बुढ़ा दल (पंजवा तख्त) प्रमुख बाबा बलबीरसिंग 96 करोडी, बाबा कन्हैय्याजी, बाबा रणजीतसिंह (मनमाड), जयमलसिंह धिल्लो (नांदेड), सुखदेवसिंह (दमदमा साहेब) आणि पंचप्यारे यांचे स्वागत जनक आहुजा यांनी केले. यावेळी हरजीतसिंग वधवा, जगजीतसिंग (जितू) गंभीर, प्रितपालसिंग धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, अनीश आहुजा, चिंटू गंभीर, टिटू चोप्रा, अमित थापर, कैलाश नवलानी, राजा नारंग, सिमर वधवा, राजू जग्गी, सनी वधवा, नारायण अरोरा, कवलजितसिंग गंभीर, राजवंश धुप्पड, कन्हैय्या बालानी, सिमरजितसिंह वधवा, अमिता कंत्रोड आदींसह शीख, पंजाबी व सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर-कीर्तनात बाबाजींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी बाबा बलबीरसिंग 96 करोडी यांनी भाविकांशी संवाद साधून पवित्र अरदास केली. जनक आहुजा यांनी सांगितले की, संत-महात्म्यांच्या आगमनाने व नगर-कीर्तनाने शहराची भूमी पावन झाली आहे. त्यामुळे सर्व समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर-कीर्तनात गुरु हरगोविंद साहेबांची कटार, श्री गुरु गोबिंदसिंगजींची तलवार (कृपान), बाबा फतेहसिंह यांची ढाल, तसेच बाबा दीपसिंहजींची दुमाला (पगडी) चक्राचा समावेश होता. भाविकांनी या शस्त्रांचे मनोभावे दर्शन घेतले.
दमदमा साहेब, पंजाब येथून निघालेल्या या नगर-कीर्तनाच्या माध्यमातून गुरुसाहेबांचा इतिहास व शौर्य भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.पुणे येथून आलेले हे नगर-कीर्तन अहिल्यानगरमध्ये दर्शनासाठी थांबल्यानंतर संध्याकाळी टॉप अप पेट्रोल पंप परिसरातून छत्रपती संभाजीनगरकडे मार्गस्थ झाले.