बाल आनंद मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम माध्यमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव व बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या मैदानावर विविध क्रीडा स्पर्धा रंगल्या होत्या. तर बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावून व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवले. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभापती सचिन जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भरोसा सेलच्या महिला पोलीस आयेशा शेख आणि निर्भया पथकाच्या पुनम डोंगरे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष शाहिद काझी, संस्थेचे सचिव रेहान काझी, विश्वस्त डॉ. अस्मा काझी, सईद शेख उपस्थित होते.
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव रेहान काझी यांनी शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह त्यांच्या सर्वांगीन विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगून शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. महिला पोलीस आयेशा शेख यांनी शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जातो. विविध उपक्रमातून सुप्त कलागुणांना वाव मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सचिन जाधव म्हणाले की, शालेय जीवनात शिक्षणाबरोबर मैदानी खेळाला देखील महत्त्व द्यावे. शरीर व मन चांगले राहण्यासाठी मैदानी खेळाची गरज पडते. जीवनात विविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी शारीरिक क्षमता देखील महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. तर शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे आश्वासन दिले.
पालक व शाळेच्या वतीने सचिन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक समिउल्ला शेख, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एजाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख संतोष सुंबे, निलोफर शेख, बाळासाहेब चौधरी आदींसह इतर सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने क्रीडा स्पर्धा व बाल आनंद मेळावा वातावरणात पार पडला.
