पुणे विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय व महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत पै. विराज बाबासाहेब बोडखे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 17 वर्षाखालील गटात सुवर्णपदक पटकाविले. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नुकतेच शहरातील भिस्तबाग, पवन नगर येथील छत्रपती संभाजी महाराज कुस्ती केंद्र येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा पार पडली. यामध्ये महापालिका हद्दीतील विविध शाळांतील 115 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. पै. विराज बोडखे याने चितपट कुस्ती करुन विजेतेपद पटकाविले आहे. त्याची पुणे विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, सोलापूर व नगर या जिल्ह्यातील विजयी झालेल्या खेळाडूंमध्ये सामने होणार आहेत. यामधील विजयी खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत.
पै. विराज बोडखे हा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक तथा शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांचा लहान मुलगा आहे. तो भिस्तबाग येथील छत्रपती संभाजी महाराज कुस्ती केंद्रात पै. शिवाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वस्ताद पै. संदीप गायकवाड, पै. नितीन आव्हाड, पै. आतीष ठाकूर, पै. शंभू यादव यांच्याकडे कुस्तीचे धडे घेत आहेत. तो सावेडी येथील आनंद विद्यालयात इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप व गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्यासह आनंद विद्यालयाचे मुख्याध्यापक व शालेय शिक्षक, शिक्षकेतरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.