भाई सथ्था नाईट हायस्कूलचे राज्यात अव्वल स्थान
चार विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत
नगर (प्रतिनिधी)- शिक्षणापासून वंचित राहिलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या हिंद सेवा मंडळाच्या भाई सथ्था नाईट हायस्कूलने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. या शाळेने राज्यातील सर्वाधिक विद्यार्थी 10वी बोर्ड परीक्षेसाठी प्रवेशित केले असून, त्यापैकी 4 विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकले. या कामगिरीमुळे राज्यातील सर्व रात्रशाळांमध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मुंबई येथील मासूम संस्थेच्या वतीने राज्यातील सर्व भाषिक रात्रशाळांचे परीक्षण करण्यात आले. या परीक्षणात भाई सथ्था नाईट हायस्कूलला राज्यात अव्वल ठरवून सन्मानित करण्यात आले.
या यशानंतर शाळेचे प्राचार्य सुनिल सुसरे, शिक्षकवर्ग तसेच राज्याच्या गुणवत्ता यादीत चमकलेले विद्यार्थी दीक्षा रमेश गवळी (प्रथम क्रमांक, समाजशास्त्र विषयात 100 पैकी 95 गुण), मंदा भाऊसाहेब भोराडे (पाचवा क्रमांक), इशिता विक्रम भोर (आठवा क्रमांक), जयश्री जगन्नाथ वैरागर यांचा हिंद सेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, दीक्षा गवळीने समाज अभ्यास विषयात राज्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल त्यांचे विषय शिक्षक गजेंद्र गाडगीळ यांचाही विशेष सन्मान झाला.
सन्मान सोहळा हिंद सेवा मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अजितशेठ बोरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा संगीता ॲबट, पेमराज सारडा कॉलेजचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, शाळेच्या चेअरपर्सन प्रा. ज्योतीताई कुलकर्णी, शालेय समिती सदस्य विलास बडवे, सहाय्यक सचिव बी.यू. कुलकर्णी, प्राचार्य सुनिल सुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्राचार्य सुनिल सुसरे म्हणाले की, भाई सथ्था नाईट हायस्कूलने मागील 73 वर्षांपासून नगर शहरातील शाळाबाह्य विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला-मुली, विवाहित विद्यार्थिनी तसेच दिवसा शाळेत जाऊ न शकणाऱ्या गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले आहे. या कार्यासाठी मासूम संस्था देखील रात्रशाळांना प्रोत्साहन देत असून, त्याच पार्श्वभूमीवर हा सन्मान आमच्यासाठी विशेष असल्याचे ते म्हणाले.
डॉ. पारस कोठारी म्हणाले की, हे यश शिक्षकांच्या मेहनतीचे व प्रतिकूल परिस्थितीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे फलित आहे. या सन्मानामुळे शाळेची जबाबदारी आणखी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. ज्योतीताई कुलकर्णी यांनी सांगितले की, काम करून शिक्षण घेणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांची जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाल्या.
अजितशेठ बोरा यांनी सर्वसामान्य घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे कार्य भाई सथ्था नाईट हायस्कूल सातत्याने करत असून, मासूम संस्थेचे पाठबळ या कार्याला नवी ऊर्जा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. संगीता ॲबट यांनी माजी चेअरमन डॉ.पारस कोठारी,प्राचार्य व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमप्रसंगी मंदा भोराडे या विद्यार्थिनीने आपले मनोगत करुन 27 वर्षानंतर पुन्हा प्रवेशीत होऊन मिळविलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव राऊत यांनी केले. आभार बाळू गोरडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी नाईट हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नाईट हायस्कूलच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष डॉ. रमेश झरकर, मानद सचिव संजय जोशी, ज्येष्ठ मार्गदर्शक ब्रिजलालजी सारडा, माजी कार्याध्यक्ष अनंत फडणीस आणि मासुम संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निकिता केतकर यांनी अभिनंदन केले.