• Thu. Mar 26th, 2026

निंबळक गटातील हजारो महिलांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

ByMirror

Mar 25, 2026

भक्तीमय वातावरणात मराठी नववर्षाचा प्रारंभ


तीन दिवस दर्शनासाठी धावल्या 40 लक्झरी बसेस

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर निंबळक गटातील हजारो महिलांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घडविण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या माध्यमातून कुलस्वामिनी तुळजाभवानी (तुळजापूर) यात्रेचा हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.


तीन दिवस चाललेल्या या यात्रेत तब्बल तीन ते चार हजार महिला भाविकांनी सहभाग नोंदविला. निंबळक गटातील 18 गावांतील महिलांनी या यात्रेत उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमासाठी दररोज 40 लक्झरी बसची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे महिलांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळाला.


रविवारी (दि.22 मार्च) यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात नेप्ती, हमीदपूर, हिंगणगाव, जखनगाव, टाकळी, खातगाव, निंबळक, इसळक आदी गावांतील महिला भाविकांना तुळजापूरकडे रवाना करण्यात आले. प्रवासादरम्यान महिलांसाठी नाश्‍त्याची तसेच तुळजापूर येथे देवदर्शनानंतर दुपारच्या भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.


यावेळी उद्योजक अजय लामखडे, केतन लामखडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, नेप्तीचे माजी सरपंच संजय जपकर, निंबळकचे उपसरपंच बाबासाहेब कोतकर, चेअरमन भाऊराव गायकवाड ,व्हा. चेअरमन अविनाश आळंदीकर , रामदास फुले ,बाळासाहेब पगारे ,पोपट खामकर, बाळासाहेब कोतकर, भाऊसाहेब गायकवाड, बाबासाहेब पगारे, नानासाहेब पगारे, तुकाराम शेळके , बहिरु घोलप, दिपक चेडे, माजी सरपंच मिरा जपकर ,सविता चेडे, कमल चेडे, मंगलबाई गोडसे, संगीता घोलप, स्वाती घोलप, अनुसया गवळी, चंद्रकला गुलदगड आदी मान्यवर उपस्थित होते. या यात्रेला महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, धार्मिक वातावरणात एकात्मता आणि श्रद्धेची अनुभूती सर्वांनी घेतली.


उद्योजक अजय लामखडे म्हणाले की, “निंबळक गटातील माताभगिनींसाठी तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची ही यात्रा आयोजित करताना आम्हाला अत्यंत समाधान वाटत आहे. आपल्या सर्वांची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मातेचे दर्शन प्रत्येक महिलेला सहज आणि सुरक्षितरीत्या घडावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. गुढी पाडवा हा आपल्या मराठी संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या पवित्र पर्वाच्या निमित्ताने महिलांना आध्यात्मिक आनंद मिळावा आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *