मराठी फक्त भाषा नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध वारस्याचा एक भाग -न्यायाधीश संगीता ना. भालेराव
नगर (प्रतिनिधी)- भाषा ही संवादाचा अविभाज्य अंग आहे. आपले विचार भावना व्यक्त करण्याचे भाषा एक साधन आहे. महाराष्ट्रात मराठी सर्वात जास्त वापरली जाणारी भाषा आहे. जिल्हा न्यायालय स्तरापर्यंतची न्यायालयीन कामकाजाची भाषा ही मराठीच आहे. मराठी फक्त भाषा नसून, महाराष्ट्राच्या समृद्ध वारस्याचा भाग आहे. मराठीच्या बोली भाषेने आणि मौखिक परंपरेने एक मोठी लोकसंस्कृती उभी केली असल्याचे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश संगीता ना. भालेराव यांनी केले.
कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. जुने जिल्हा न्यायालय येथील कौटुंबिक न्यायालयात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात यायाधीश भालेराव बोलत होत्या. याप्रसंगी लोक साहित्याचे मराठी अभ्यासक प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ, कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मणराव कचरे, विशेष सरकारी वकील तथा उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, सचिव ॲड. राजेश कावरे आदींसह कर्मचारी, वकील व पक्षकार उपस्थित होते.
पुढे बोलताना न्यायाधीश भालेराव म्हणाल्या की, वैविध्यपूर्णतेने नटलेली मराठी भाषा आहे. कोट्यावधी लोक मराठी बोलतात. समाज जीवनाला प्रगत करण्यासाठी भाषा विचारांचे साधन आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या पक्षकारांना देखील न्याय निर्णय समजावा यासाठी जास्तीत जास्त निकाल मराठीत देण्याचा प्रयत्न केला जातो. कौटुंबिक न्यायालयात आल्यापासून आता पर्यंत 86 टक्के न्याय निवाडे मराठीतच दिले आहे. सर्वांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगावा व भाषा समृद्ध करावी. तर येणाऱ्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. डॉ. नवनाथ वाव्हळ म्हणाले की, न्याय संस्थेकडून मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम होत असल्याचा मोठा आनंद आहे. मराठीला मोठ्या संघर्षातून अभिजीत मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे. याचा प्रत्येक मराठी माणसाला अभिमान आहे. मराठी अतिशय प्राचीन व जुनी आहे. निजामशाही काळातील सापडलेल्या शिलालेखावरून हे सर्व सिद्ध होते. एखाद्या भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा देण्याची राज्यघटनेत तरतूद आहे. त्याचे निकष ठरवून देण्यात आले असून, ती भाषा प्राचीन, इतिहासात नोंद असलेली, मौल्यवान वारसा, अस्सल साहित्यिक परंपरा व इतरांपेक्षा वेगळी असलेली असणे आवश्यक आहे. मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा मिळाल्याने केंद्र सरकारकडून दरवर्षी 300 कोटी रुपये भाषेच्या विकासासाठी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात ॲड. लक्ष्मणराव कचरे यांनी मराठी भाषेला अभिजीत भाषेचा दर्जा मिळाला असताना मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा होत असल्याचे स्पष्ट करुन कार्यक्रमाचे उद्देश सांगितले. याप्रसंगी प्रबंधक एस.के. मोहोळकर, सहाय्यक अधीक्षक ए.आय. शेख, वरिष्ठ लिपिक सौ. झिंजे, स्टेनो एस.एफ. चव्हाण, कनिष्ठ लिपिक धीरज नारखेडे, सौ. तगारे, राहुल मोरे, शिपाई एस.के. जाधव, एल.एस. जाधव, ॲड. कैलास धावडे, ॲड. सुजाता बोडखे, ॲड. किरण पवार, ॲड. प्रतीक्षा मंगलारप, ॲड. के.एम. गोरे, ॲड. कैलास धावडे, पोलीस कर्मचारी भापकर, फालके, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. राजेश कावरे यांनी केले. आभार ॲड. शारदाताई लगड यांनी मानले.