ट्रस्टमध्ये नवीन सभासदत्व देण्यास टाळाटाळ? अर्जदारांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव
विश्वस्तांची मुदत संपताच सभासदत्वाचा प्रश्न ऐरणीवर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील माळी समाजाचे माळीवाडा पंच मंडळ देवस्थान या नोंदणीकृत धार्मिक ट्रस्टमध्ये सभासदत्व मिळावे, या मागणीसाठी शहरातील पाच समाजबांधवांनी उपधर्मादाय आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. संजय कानडे, बजरंग भुतारे, प्रसाद कोके, जालिंदर खंदारे आणि दिपक एकाडे यांनी हे अर्ज दिले असून, गेल्या अनेक वर्षांपासून ट्रस्टकडून नवे सभासद स्वीकारले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अर्जदारांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ते महानगरपालिका हद्दीतील कायमस्वरूपी रहिवासी असून जन्माने व धर्माने हिंदू, तसेच माळी समाजाचे आहेत. माळी समाजाचे माळीवाडा पंच मंडळ देवस्थान व धर्मफंड ए-242/अ.नगर ही ट्रस्ट संस्था कायदेशीररीत्या नोंदणीकृत असून धार्मिक स्वरूपाची आहे. संस्थेच्या नोंदणीवेळी मान्य नियमावली नसली तरी त्यानंतर मुंबई येथील धर्मादाय आयुक्तांकडून ट्रस्टसाठी अधिकृत योजना मंजूर करण्यात आली आहे. ट्रस्टकडे स्थावर मालमत्ताही असून तिचे व्यवस्थापन विश्वस्त मंडळाकडे आहे.
अर्जदारांनी दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी ट्रस्टचे अध्यक्ष / सचिव यांचेकडे मंजूर योजनेनुसार सभासदत्वासाठी अर्ज सादर केले होते. ट्रस्टचे विश्वस्त नितीन पुंड यांनी हे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारून पोहोचही दिली होती. परंतु यापूर्वीही दिलेले सभासदत्व अर्ज ट्रस्टने कधीच मंजूर केले नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. मागील 10 ते 15 वर्षांपासून माळी समाजातील कोणत्याही व्यक्तीस सभासदत्व नाकारण्यात येत असल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी मांडला आहे.
याशिवाय, सध्या ट्रस्टच्या दैनंदिन व्यवहार पाहणाऱ्या विद्यमान विश्वस्तांची मुदत संपत असून लवकरच नवीन विश्वस्त निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याचे अर्जदारांनी नमूद केले आहे. समाजातील इच्छुकांनीही ट्रस्टच्या विकासासाठी सक्रियपणे काम करण्याची तयारी दाखवली असून, आगामी निवडणुकांमध्ये सहभागी होण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.
अर्जदारांनी उपधर्मादाय आयुक्तांकडे मागणी केली आहे की, त्यांनी दाखल केलेल्या सभासदत्व अर्जांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी योग्य ती चौकशी करण्यात यावी. तसेच, अर्ज मंजूर करून त्यांना सभासदत्व देण्यात यावे, ज्यामुळे आगामी निवडणुकीत सर्व पात्र समाजबांधवांचा सहभाग सुनिश्चित होईल, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….
