विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर
महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते विचारवंत आणि क्रांतिकारक होते -प्रा. शिवाजीराव विधाते
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील दामोदर विधाते मास्तर विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये महात्मा फुले यांच्या कार्याचा, विचारांचा व समाजप्रबोधनाच्या संदेशाचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या हस्ते हा पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक ज्ञानदेव पांडुळे, अभिषेक चिपाडे, अवधूत फुलसौंदर, संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते, मयूर विधाते, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक शिवाजीराव म्हस्के, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संतोष सुसे तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढा देत शिक्षणाची क्रांती घडवून आणली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून समाजाला नवदिशा दिली. आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. समाजात समानता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रा. शिवाजीराव विधाते म्हणाले की, महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते विचारवंत आणि क्रांतिकारक होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना उभारी दिली. आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण न घेता समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा फुले यांच्या जीवनातून घ्यावी. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हेच खरे अभिवादन त्यांना ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल मेहेत्रे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना फुले यांच्या कार्याचा परिचय करून दिला. पाहुण्यांचा परिचय निता जावळे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश दरवडे यांनी केले, तर आभार राधाकिसन क्षीरसागर यांनी मानले.
