सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांच्या पाठपुराव्याची शासनाने घेतली दखल
छत्रपती शिवाजी महाराज व राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा टॉयलेट साइनबोर्ड म्हणून वापर झाल्याचा आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरियाणा राज्यातील फरीदाबाद जिल्ह्यातील सिक्री येथे असलेल्या मिलन बँक्वेट हॉलमध्ये राष्ट्रातील महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रतिमांचा कथित अवमान झाल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत हरियाणा राज्य सरकारच्या उपसचिवांना अधिकृत पत्र पाठविले आहे.
या संदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने या तक्रारीची नोंद घेतली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाचे उपसचिव महेश वाव्हळ यांनी हरियाणा शासनाला पाठविलेल्या पत्राची प्रत वधवा यांना पाठवून माहिती देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील सिक्री परिसरातील मिलन बँक्वेट हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा वापर स्वच्छतागृह दर्शक (टॉयलेट साइनबोर्ड) म्हणून केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली. राष्ट्राच्या इतिहासातील महान व्यक्तिमत्त्वांचा अशा प्रकारे अवमान करण्यात आल्याचा आरोप करत अनेकांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांनी पुढाकार घेत औपचारिक तक्रार दाखल केली. त्यांनी हरियाणा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री कार्यालय, सांस्कृतिक कार्य विभाग आणि गृह विभाग यांना ई-मेलद्वारे तक्रार नोंदवली. या तक्रारीत संबंधित घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भात हरियाणा शासनाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन अशा पद्धतीने करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे की त्यामुळे काही नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात किंवा ते अयोग्य वाटू शकते. जर या संदर्भातील अहवाल सत्य आढळले, तर या बाबीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, कारण यामुळे सार्वजनिक ठिकाणी सामाजिक सौहार्द आणि सभ्यतेवर अनवधानाने परिणाम होऊ शकतो.
यामुळे या प्रकरणाची शक्य तितक्या लवकर चौकशी करून आवश्यक असल्यास योग्य ती तपासणी करण्यात यावी, अशी विनंती महाराष्ट्र शासनाने हरियाणा सरकारकडे केली आहे. तसेच, जर नियमांचे किंवा सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले, तर भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी लागू असलेल्या तरतुदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे. संबंधित प्राधिकरणांनी या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून व्यापक जनहित लक्षात घेऊन योग्य ती पावले उचलावीत, असेही महाराष्ट्र शासनाचे उपसचिव महेश वाव्हळ यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
