तर सेक्रेटरीपदी सुजाता कटारिया यांची नियुक्ती
नगर (प्रतिनिधी)- इनरव्हील क्लब ऑफ अहिल्यानगरचा 32 वा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. मावळत्या अध्यक्षा उज्वला भंडारी यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा मधुबाला चोरडिया यांना अध्यक्ष पदाची सूत्रे सोपविण्यात आली. तर क्लबच्या वतीने 151 वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून हायजिन फर्स्टच्या संचालिका वैशाली गांधी होत्या. गांधी म्हणाल्या की, ग्रुपच्या माध्यमातून महिला जे काम करत आहेत ते खूप मोठे कार्य आहे. आपला संसारा सोबत महिलांनी एक विचार हाती घेतला आहे. तसेच नुतन अध्यक्षा मधुबाला चोरडिया या सर्व गृहिणीसाठी आदर्श आहेत. जेव्हा एखादी स्त्री आपला व्यवसाय, घर व सामाजिक कार्य चांगल्या पद्धतीने सांभाळते. त्या स्त्रीला वेगळ्या ब्युटीपार्लरची गरज नसते. कारण हे काम करताना जो ग्लो, कॉन्फिडन्स येतो. तो त्यांच्या कामाच्या उत्साहातून येतो, असे सांगून त्यांनी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्षा मधुबाला चोरडिया यांनी इनरव्हील क्लब ऑफ अहिल्यानगर ही एक महिलांसाठी असलेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवाभावी संस्था आहे. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी काम करणे, तसेच समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवणे आहे. लवकरच क्लबच्या मध्यमातून आरोग्य शिबिरे, शैक्षणिक कार्यक्रम, आणि गरजू लोकांसाठी मदतकार्य आयोजित केले जाणार असल्याचे सांगितले. तर येणाऱ्या काळात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली व संघटनेची धोरण त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पिडीसी सायली खानदेशे, सेक्रेटरी सुजाता कटारिया, खजिनदार डॉ. नीलम बागल, आयएसओ नूतन चोरडिया, लक्ष्मी काळे, उपाध्यक्षा प्रभा खंडेलवाल, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर कांता चंगेडिया, मंगल मुथा, रेशमा चारनीया, कल्पना मुथा, मनीषा झीने, गायत्री पित्रोडा आदींसह आजी-माजी पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
याप्रसंगी 313 इनरव्हीलचे सर्व मेंबर, रोटरीचे अध्यक्ष सुनील कटारिया, रोटरीचे माजी अध्यक्ष नरेंद्र चोरडिया, ललित कर्नावट यांचा सत्कार करण्यात आला. नवीन आलेल्या सदस्यांना पिडीसी सायली खानदेशे यांनी इनरव्हीलची माहिती सांगून शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमा निसळ व लक्ष्मी काळे यांनी केले. उपाध्यक्षा प्रभा खंडेलवाल यानी आभार मानले.