• Sun. Jan 25th, 2026

स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती वृक्षारोपणाने साजरी

ByMirror

Jan 23, 2026

भारतीय लहुजी सेना व मानवी हक्क अभियानचा पर्यावरणपूरक उपक्रम

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय लहुजी सेना व मानवी हक्क अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पर्यावरणपूरक उपक्रमातून साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून या दोन महान राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कलमी आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्यात आली असून, केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन व जतन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.


या वृक्षारोपण कार्यक्रमात माजी नगरसेवक अनिल शेकटकर व मानवी हक्क अभियानचे शहर-जिल्हाध्यक्ष अशोक भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भारतीय लहुजी सेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रमुख सुनील सकट यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस दलातील इरफान शेख, संतोष शिरसाठ, किशोर रायमोकर, लखन साळवे यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या माध्यमातून स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विचार तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशभक्तीचे व स्वातंत्र्याचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.
सुनील सकट म्हणाले की, “स्व. बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे दोघेही सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आणि राष्ट्राच्या सन्मानासाठी अखंड लढणारे नेते होते. त्यांची जयंती केवळ फोटो पूजनापुरती मर्यादित न ठेवता, समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमातून साजरी करणे ही काळाची गरज आहे. आजच्या वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देतानाच भावी पिढीचे उज्वल भविष्य घडवण्याचा आम्ही संकल्प घेतला आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, हीच या उपक्रमामागील खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.


अनिल शेकटकर म्हणाले की, “स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी आवाज उठवला, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले. त्यांच्या विचारांची खरी आठवण म्हणजे समाजहिताचे आणि राष्ट्रहिताचे कार्य करणे आहे. या वृक्षारोपण उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात येत आहे. भारतीय लहुजी सेना व मानवी हक्क अभियानचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *