सांस्कृतिक कार्यक्रमातून ‘नारीशक्ती’चा जागर; पर्यावरण व पाणी प्रश्नावर प्रभावी संदेश
‘ऑपरेशन सिंदूर’ च्या सादरीकरणातून देशभक्तीची ज्योत प्रज्वलित
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून स्त्री शक्तीचे दर्शन घडविले. पर्यावरण व पाणी प्रश्नावर गीत व नाटिकेद्वारे जागृती केली. गरबा नृत्य, आदिवासी नृत्य आणि महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील पारंपारिक गीतांवर नृत्याचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.

लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन कर्मवीर भाऊराव व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अर्जुनराव पोकळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठविधीज्ञ ॲड. विक्रम वाडेकर, जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, स्कूल कमिटी सदस्य अंबादास गारुडकर, सल्लागार समिती सदस्य माजी प्राचार्य शिवाजीराव भोर, विष्णुपंत म्हस्के, शामराव व्यवहारे, विश्वासराव काळे, माजी सहसचिव तथा जनरल बॉडी सदस्य डॉ. के.एच. शिंदे, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छायाताई काकडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका छायाताई काकडे यांनी शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याशिवाय कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना चालना देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचे स्वागत ज्येष्ठ शिक्षक महादेव भद्रे यांनी केले.
ॲड. विक्रम वाडेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोबाईल हे मारक ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुण बहरण्यासाठी त्यांना मोबाईलपासून परावृत्त करावे लागणार आहे. मोबाईलचा उपयोग फक्त ज्ञान आत्मसात व शिक्षणासाठी होण्याची गरज आहे. मात्र विद्यार्थी फक्त रिल्स स्क्रोलींग करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अर्जुन पोकळे म्हणाले की, सक्षम विद्यार्थी घडण्यासाठी ज्ञानाबरोबरच व्यायाम महत्त्वाचा आहे. विविध क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी सदृढ शरीर देखील महत्त्वाचा आहे. रयत शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास साधला जात आहे. तसेच सर्वसामान्य वर्गाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन, शाळेत सर्वधर्म समभाव या मुल्यांची रुजवण केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखून त्या दिशेने पालकांनी प्रोत्साहन द्यावे. शिक्षक-पालकांनी विद्यार्थ्यांचे कलागुण ओळखणे, हे आजच्या काळाची गरज निर्माण झाली असल्याचे सांगितले
देवा श्री गणेशा या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आम्ही गड डोंगरच राहणार…, तांडव नृत्य…, महाभारत गीत नृत्य… गणपती आरती या गीतांवर युवक-युवतींनी बेभानपणे नृत्य सादर केले. पाणी हरवलं या भारुड गीताद्वारे पाणी चे महत्व पटवून देण्यात आले. कोळीवाड्याची शान, साउथ इंडियन डान्सद्वारे विविध संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.
नारी शक्ती नृत्यद्वारे स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्रावर नाटिका व गीत सादर करण्यात आले. सख्खी बायको गेली… या भारुड गीताने संपूर्ण सभागृहात हास्य फुलले होते. ऑपरेशन सिंदूर ने भारतीय सैन्य जवानांची शक्ती प्रदर्शित करून देशभक्ती जागृती करण्यात आली. यामध्ये वस्तीगृहातील मुलींनी देखील विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पिसाळ व प्रदीप पालवे यांनी केले. आभार स्वाती गारुडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , सुनीता लांडगे, मंगेश कारखिले, उमेश विलायते, राजेंद्र देवकर, सुषमा गंभीरे, सुवर्णा सानप, ज्योती उबाळे, जिजामाता कन्या वस्तीगृह अधीक्षक ज्योती मोकळ, अमृता थोरात, सुप्रिया निमसे या शिक्षक, शिक्षकेतरांचे सहकार्य लाभले.
